वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी एनआयएने नऊ ठिकाणी छापे ठाकले होते. यावेळी आयसिसच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासात या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशाल करोळे | Updated: Feb 16, 2024, 10:50 AM IST
वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यात काही जण सहभागी होत असल्याची माहिती मिळताच एनआयएच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीगनर शहरात नऊ ठिकाणी एनआयएच्या पथकाने छापे मारले. या छाप्यात एनआयएच्या हाताला महत्त्वाची व्यक्ती हाती लागली आहे. त्याच्या घरातून अनेक आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक गॅझेट, तसेच गुन्हेगारीशी संबंधित असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली.

दहशतवादी कारवायांसाठी भडकावणाऱ्या मोहंमद झोएब खान या 35 वर्षीय युवकाला अटक केल्यानंतर अनेक बाबी आता पुढं येऊ लागल्या आहेत. गुरुवारी हर्सूलच्या बेरीबाग, भागातून या संशयितास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली.

कोण आहे मोहम्मद झोएब?

मोहम्मद झोएब हा आयटी इंजिनिअर आहे. तो बंगळुरूमध्ये नोकरीस होता. सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे असे तो सांगायचं. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार कोरानानंतर झोएबने नोकरी सोडली होती आणि दहशतवादी कारवायांमध्ये तो पूर्णतः सक्रिय होता. नोकरी सोडून तो
घरातूनच दहशतवादी कारवायांसाठी नेटवर्क चालवायचा. झोएबला 9 आणि 3 वर्षांची दोन मुले तर 6 वर्षाची मुलगी आहे. झोएबची पत्नी मुलांसह माहेरी राहते. तर बेरीबागमध्ये तो वृद्ध वडील, आई, बहीण आणि तिच्या मुलांसह राहतो. झोएबचे 81 वर्षांचे वडील सेवानिवृत्त कृषी अधीक्षक असून बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये ते रुजू होते.

झोहेबच्या दोन भावांपैकी एक भाऊ ओमानमधील मस्कत शहरात प्राध्यापक आहे. दुसरा भाऊ उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये अभियंता आहे. तर बहिणीचा पती दुबईत नोकरी करतो. झोहेबचे स्थानिक घरही अत्यंत साधे, कोणतेही रंगरंगोटी न केलेले आहे. त्याच्या घरात फारशा वस्तूदेखील नाहीत. झोएब चोवीस तासांपैकी अर्धाअधिक काळ त्याच्या बेडरूमध्येच थांबायचा. आजूबाजूच्या परिसरात देखील त्याने कधीच कोणाशी संवाद साधला नाही.

वेब डिझायनिंगचे काम करता करता झोएब खान आयसिसच्या संपर्कात आला. त्याचे वडील शासकीय कर्मचारी आहेत. दहशतवादी नेटवर्क पुढे नेण्यासाठी तो आणि त्याचा साथीदार देशातील आणि परदेशातील त्यांच्या हँडलर्सच्या सतत संपर्कात होते. सीरियातील हिंसक आणि हिज्जाशी संबंधित व्हिडिओ ते शेअर करत होते. झोएबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे.

दरम्यान, झोएब आयसिस खलिफाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देऊन झोएब आणि साथीदार तरुणांची माथी भडकवत आणि त्यांना आयसिसमध्ये भरतीसाठी प्रवृत्त करत. झोएब प्रत्यक्ष भेटून अथवा सोशल मीडियावरुन तरुणांना आयसिसमध्ये भरती करत होता.