पुण्यात कंपनीच्या कँटिंगमधील समोशात सापडलं कंडोम आणि गुटखा; सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले

पिंपरी चिंचवडमधील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशात कंडोम, गुटखा, दगड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी केल्यानंतर समोर आलेलं सत्य पाहून सगळेच हादरले.   

शिवराज यादव | Updated: Apr 8, 2024, 06:18 PM IST
पुण्यात कंपनीच्या कँटिंगमधील समोशात सापडलं कंडोम आणि गुटखा; सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले title=

पिंपरी चिंचवडमधील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशामध्ये कंडोम, दगड, गुटखा यासह अनेक इतर वस्तू आढळल्याचं समोर आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 27 मार्चला ही घटना उघडकीस आली होती. यानंतर पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामधील एकाला अटकही करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता काही धक्कादायक खुलासे झाले. 

कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक कीर्तिकुमार शंकरराव देसाई यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासात एका व्यावसायिकाने स्पर्धेच्या इर्षेतून हे केल्याचं समोर आलं आहे. कंपनीसह आपला करार संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदाराकडून केटरिंग कंत्राट मिळवण्यासाठी हे भयावह कृत्य घडवून आणल्याचं चौकशीत समोर आलं आहे. 

अक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव फिरोज शेख उर्फ मंटू असं आहे. तसंच ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची नावं रहीम शेख, अझर शेख, मझर शेख (रा. मोरवाडी), विकी शेख अशी आहेत. 

नेमकं काय झालं? 

एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधे खाद्यपदार्थ पुरवण्याचा करार कीर्तिकुमार देसाई यांच्या कंपनीसोबत झाला होता. देसाई यांची कंपनी मोरवाडी येथे असणाऱ्या मे. एसआरएस एंटरप्रायझेस या उप-कंपनीकडून समोसा घेत होती. याचाही करार झाला होता. मात्र एसआरएस एंटरप्रायझेसने कंपनीला दिलेल्या समोशात प्रथमोपचार पट्टी आढळली होती. यामुळे देसाई यांच्या कंपनीने त्यांच्याकडून समोसे घेणं बंद केलं होतं. 

देसाई यांच्या कंपनीने यानंतर समोशासाठी मनोहर एंटरप्रायझेससोबत करार केला. ही बाब एसआरएस एंटरप्रायझेसला खटकली होती. त्यामुळे देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. या कंपनीची प्रतिमा खराब करण्याचं आणि त्यांचं अन्न पुरवण्याचं कंत्राट रद्द व्हावं यासाठी कट आखला. एसआरएस एंटरप्रायझेसचे मालक रहीम शेख, अझर शेख व मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज,  विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात कामासाठी पाठवलं. 

फिरोज आणि विकी यांनी मालक रहीम शेख, अझर शेख व मझर शेख यांच्या सांगण्यावरुन समोसा तयार करताना त्यात कंडोम, दगडं, विमल, पान, गुटखा असे पदार्थ मिसळले. कर्चमाऱ्यांना समोशात या गोष्टी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. देसाई यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. फिरोजला अटक केलं असता सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांनी अन्न प्रशासनालाही या घटनेची माहिती दिली आहे. कामगारांच्या जीवाशी खेळ केल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.