माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. पीएम मोदींच्या डिग्रीची विचारणा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

Updated: Apr 10, 2023, 07:52 PM IST
माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला title=

PM Modi Degree : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिग्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पीएम मोदी यांचं शिक्षण किती झालं आहे, यासाठी त्यांची डीग्री दाखवण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejarial) यांनी केली होती. पण या प्रकरणात केजरीवाल यांनाच दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात हायकोर्टाने (Gujrat Highcourt) अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डीग्री (Degree) सार्वजनिक करण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी (Prithviraj Chavan) पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरून जोरदार टीका केलीय. माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? असा सवाल करत चव्हाणांनी मोदींच्या डिग्रीवर आक्षेप घेतलाय. निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली तर सदस्यत्व रद्द होऊ शकतं असही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हंटलय. ठाण्यातल्या काँग्रेस मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाणांनी ही टीका केलीय. 

आता आपले मित्र असतात, शाळेतील कॉलेजमधील माझा मित्र मुख्यमंत्री झाला किंवा मंत्री झाला असं शेअर करतात. पण यांचं कोणी सांगतं का की माझ्या बाकावर बसलेला मित्र मुख्यमंत्री झाला,  पंतप्रधान झाला असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. पण हा विनोदाचा विषय नाही, हा गुन्हा आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आता धावपळ झाली डिग्री दाखवायची, पण यात युनिव्हर्सिटी स्पेलिंग चुकीची झाली आहे, काही लाज लज्जा शरम राहिलेली नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलंय. 

शरद पवारांवरही निशाणा
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे. 2003 साली शीतपेयांमध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले होते. या संदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखासी जेपीसीची स्थापना झाली होती. मी त्या जेपीसी समितीचा सदस्य होतो. या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत.

अदानीला हिंडनबर्ग ने टार्गेट केले आहे, कारण चोरांनाच टार्गेट केले जाते. आता अदनीच्या बाजूने टिव्हीवर जाऊन कोणी मुलाखत दिली हे महत्वाचं नाही, याप्रकरणाची जेपीसी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचं सांगत चव्हाण यांनी शरद पवारांवर टीका केली. 

तुम्ही निवडणूक लढताना माहिती दिली ती खोटी असेल तर सदस्यत्व रद्द होऊ शकते. कोणी शिकले नाही तरी पदावर काम केलं आहे देशात किंवा राज्यात अशी उदाहरण झाली आहेत. पण तुम्ही माहिती देताना BA, MA झाले माहिती दिली आहे. तुम्ही निवडणूक लढताना माहिती दिली ती खोटी असेल तर सदस्यत्व रद्द होऊ शकतं, अमित शाह यांनी गुजरात युनिव्हर्सिटी डिग्री दाखवली असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. 

संजय राऊत यांचा टोला
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पीएम मोदींच्या डीग्रीवरुन टोला लगावला होता. आमचे पंतप्रधान मोदी यांची डिग्री बोगस आहे असं लोक म्हणतात. पण, पीएम मोदींची 'Entire Political Science’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक आणि  क्रांतिकारी डिग्री आहे. ही डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लावायला हवी. जेणेकरून लोक पंतप्रधान मोदींच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.