काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  

Updated: Oct 31, 2020, 02:18 PM IST
काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण  title=
संग्रहित छाया

नांदेड : शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. त्यामुळे आघाडी सरकारमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसने थेट शिवसेनेच्या नेतृत्वाकडे बोट दाखविल्याने शिवसेना आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन वाद उफाळण्याची शक्यता लक्षात येताच चव्हाण यांनी घुमजाव केले. आपण तसे म्हणालो नाही निधी मिळायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही. आपले सरकार असून काही उपयोग नाही, असे वक्तव्य करत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परभणी येथील एका कार्यक्रमात टीका केली. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे त्यांनी सांगितले. मात्र अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर आपण तसे म्हणालो नाही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला.

पायलट प्रोजेक्ट उभारणार

दरम्यान, मराठवाड्याला निधी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर चव्हाण म्हणाले, मराठवाड्याला निधी कमी पडू देणार नाही. लागला तर पुन्हा देऊ. बांधकाम विभागाला ६३५ कोटींच पॅकेज देण्यात आले असून त्यातील ५५० कोटी मराठवाड्यासाठी वेगळे काढल्याच चव्हाण म्हणाले. रेती घाटा भरून ये जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होतात. अश्या भागातील रस्ते सिमेंट काँक्रेटचे बनवून या मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्यांसाठी टोल उभारण्याच्या बांधकाम विभाग विचाराधीन आहे.

परभणी, हिंगोली, नांदेड या भागात हा पायलट प्रोजेक्ट उभारण्यात येणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे कालच महाविकास आघाडीने पाठवली आहेत. मी कधीही तारीख पे तारीख चंद्रकांत पाटलांसारखी देत नाही, माझ्याच्याने जे होते, तेच मी करीत असतो, मी विमानाने नाही तर बाय रोड ने फिरत असतो, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला.

शिवसेनेकडून चव्हाणांना उत्तर

दरम्यान, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना सचिव आणि खासदार विनायत राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली तर मुख्यमंत्री निधी देताना कुठलीच काटकसर करत नाहीत, अस् सांगत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. अब्दुल सत्तार यांनी सांगितले, महाविकास आघाडी पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यासहित त्यांच्या खात्यासहित त्यांच्या मतदार संघापर्यत निधी दिला जातो. तिन्ही नेत्यांच्या लोकप्रतिनिधींचा सन्मान मुख्यमंत्री करत असतात. पहिलं असे सरकार आहे की, जिथे मंत्र्यांना इतके अधिकार देण्यात आलेत. मुख्यमंत्री इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत असल्याचा उल्लेख अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला.