अपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी

 याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Updated: Apr 10, 2024, 08:42 PM IST
अपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी title=

Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचार करुन परतत असताना भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ ही दुर्घटना घडली. पटोले यांच्या कारला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केला असून, ही गंभीर घटना असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं आहे. त्यासोबतच भाजपकडून पटोलेंचा घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवले आहे. या पत्रात घडलेल्या संपूर्ण घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच याद्वारे चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट, याबद्दल सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंसह विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.  

काँग्रेसच्या पत्रात नेमकं काय?

"नाना पटोले यांच्या कारला 9 एप्रिलला भंडारा जिल्ह्यात झालेला अपघात ही अत्यंत चिंतेची बाब आहे. नाना पटोले हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवास करत होते. या दुर्घटनेचा महाराष्ट्रातील परिस्थिती आणि आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी, या उद्देशाने काही गैरप्रकार घडवले जात आहेत का, याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच हा अपघात नैसर्गिकरित्या झाला की जाणूनबुजून रचला गेला होता, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. त्यासोबतच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली जावी आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात", असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिले आहे. 

Congress letter

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

दरम्यान नाना पटोले हे प्रचारसभा संपवून परतत असताना भंडाऱ्याजवळच्या भिलेवाडा गावाजवळ त्याला कारचा भीषण अपघात झाला. ही दुर्घटना मध्यरात्री घडली. नाना पटोले मंगळवारी त्यांची प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडाऱ्याजवळ आपल्या वाहनाला एका ट्रकनं जाणीवपूर्वक धडक मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं कारला एका बाजूनं ट्रकनं घासत पुढे नेलं. सुदैवानं मला काही इजा झाली नाही. जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळं मी सुरक्षित आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती.