महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या हजाराच्या पार, एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढले

महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे.

Updated: May 14, 2020, 10:24 PM IST
महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या हजाराच्या पार, एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढले title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे. राज्यात आत्तापर्यंत १,०१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक १,६०२ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७,५२४ झाली आहे, तर ६,०५९ जण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या एका दिवसात कोरोनाचे ५१२ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची कालपर्यंतची संख्या ९७५ एवढी होती, म्हणजेच एका दिवसात कोरोनामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १६,७३८ एवढी झाली आहे, तर ६२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये कोरोनाचे एका दिवसात ३३ रुग्ण वाढले आहेत. धारावीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४९ एवढी झाली आहे. धारावीमध्ये आज ९ मृत्यूंची नोंद झाली असली तरी आजचे मृत्यू हे २ आहेत, तर उर्वरित ७ मृत्यू हे गेल्या २-३ दिवसातील आहेत. धारावीमध्ये कोरोनाचे एकूण १,०६१ रुग्ण आहेत. दादरमध्ये कोरोनाचे ६ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १३९ एवढी झाली आहे. माहिममध्ये ७ नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १६२ झाली आहे. 

आज झालेल्या ४४ मृत्यूंपैकी २५ मृत्यू मुंबईमध्ये, १० नवी मुंबईमध्ये, ५ पुण्यात, २ औरंगाबाद शहरात, १ पनवेलमध्ये आणि १ कल्याण-डोंबिवलीमध्ये झाला आहे. नवी मुंबईतले १० मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या काळातले आहेत. 

आज झालेल्या ४४ मृत्यूंमध्ये ३१ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. यातले २१ जण ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आहेत. तर ४०-५९ वयोगटातील २० आणि  ४० पेक्षा कमी वय असणारे ३ जण आहेत. ४४ पैकी ३४ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.