उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा, या घोटाळा प्रकरणात क्लीन चीट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी एक दिलासा 

Updated: Feb 18, 2021, 09:38 PM IST
उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा, या घोटाळा प्रकरणात क्लीन चीट title=

दीपक भातुसे, मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. राज्याच्या सहकार विभागाने राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चौकशी समितीच्या अहवालात अजित पवार यांच्यासह तत्कालीन ६५ संचालकांना क्लीनचीट देण्यात आली आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदींचा समावेश आहे.

राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांसह ६५ संचालकांना मिळालेली ही दुसरी क्लीन चीट आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीने या गैरव्यवहाराचा तपास केला होता. त्या तपासातही अजित पवारांसह इतर संचालकांना क्लीन चीट मिळाली होती. 

ऑगस्ट २०१९ मध्ये राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची एसआयटी नेमण्यात आली होती. एसआयटीने अजित पवार यांच्यासह  न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.