Gold Hallmark : तुम्ही खरेदी केलेले दागिने नकली तर नाहीत ना? असा घातला जातोय ग्राहकांना गंडा

Fake Gold : ग्राहक आपल्या नेहमीच्या सराफावर विश्वास ठेवून सोने खरेदी करतो. मात्र आता ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना योग्य काळजी घ्या.

Updated: Jan 23, 2023, 06:44 PM IST
Gold Hallmark : तुम्ही खरेदी केलेले दागिने नकली तर नाहीत ना? असा घातला जातोय ग्राहकांना गंडा title=

Gold Hallmark : काही दिवसांवर लग्नसराई येवून ठेपल्याने सध्या खरेदीचा हंगाम सुरु झालाय. कपड्यांपासून सोन्यापर्यंत (Gold) जोरदार खरेदी केली जातेय. ग्राहक आपल्या विश्वासू व्यापाऱ्यांकडून या सगळ्या वस्तूंची खरेदी करत असतो. मात्र कधी कधी विश्वासाला तडा जातो आणि ग्राहकाची फसवणूक होते. असाच काहीसा प्रकार राज्यात सुरु आहे. सोनं खरेदी करताना त्याची शुद्धता (Pure Gold) तपासताना आपण त्याच्यावर हॉलमार्क (Gold Hallmark) आहे की नाही हे तपासून घेतो. मात्र आता थांबा. तुम्ही वापरत असलेले सोन्याचे दागिने हे बनावट हॉलमार्कचे तर नाहीत ना याची खात्री करुन घ्या.

सोनं खरेदीत लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारनं सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक केलंय. मात्र काही भामट्यांनी यातही संधी साधत ग्राहकांची फसवणूक सुरू केलीय. सोन्याच्या दागिन्यांवर नकली हॉलमार्किंग करत हे सोनं ग्राहकांच्या माथी मारलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS ने राज्यात छापेमारी करत अडीच किलोचं बनवट सोनं हस्तगत केलंय. नागपूर, मुंबई, पुणे आणि ठाणे इथे टाकलेल्या धाडीतून नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले 1 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

BOGUS GOLD

हॉलमार्किंग म्हणजे काय? 

हॉलमार्किंग हे सोन्याच्या शुद्धतेचं वैशिष्ट्यं आहे. BSIद्वारे सोन्याच्या गुणवत्तेची पातळी तपासली जाते. सोन्याच्या हॉलमार्कमध्ये बीआयएसचं त्रिकोणी चिन्ह असतं. त्यावर हॉलमार्किंग केंद्राची एक खूण असते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो सोन्याचा दागिना कधी बनवला आहे, हे देखील त्यावर लिहिलेलं असतं. 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएसची हॉलमार्किंग केली जाते.

Hallmark Gold

सोन्याची शुद्धता कशी ओळखाची? 

सोन्याचे दागिने हे शुद्ध आहेत की नाही हे तपासण्याचा एक पर्याय म्हणजे हॉलमार्क. हॉलमार्क असलेले सोने हे एका कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंत असते. कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता मोजण्यासाठी कॅरेट या मापकाचा वापर केला जातो. 22 कॅरेट सोने हे दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. त्यावर 916 लिहिलेले असते. 24 कॅरेट सोने हे शुद्ध सोने मानले जाते. त्यावर 999 असे लिहिलेले असते. 21 कॅरेटच्या दागिन्यांवर 875 लिहिलेले असते. तर 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिलेले असते. जर 14 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 585 लिहिले जाते.

24 आणि 18 कॅरेटमध्ये फरक काय? 

22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने असते, तर  8.33 टक्के इतर धातू मिसळलेला असतो.  21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोने असते. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोने असते.