शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटींचे बोगस कर्ज, रत्नाकर गुट्टेला अटक

शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटी रुपयांचं बोगस कर्ज काढणाऱ्या गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक, 'गंगाखेड शुगर्स'चे चेअरमन रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली आहे.  

Updated: Mar 26, 2019, 11:49 PM IST
शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटींचे बोगस कर्ज, रत्नाकर गुट्टेला अटक title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटी रुपयांचं बोगस कर्ज काढणाऱ्या गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक, 'गंगाखेड शुगर्स'चे चेअरमन रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद सीआयडीने ही कारवाई केली आहे. गुट्टेसह लेखापाल गायकवाडलाही न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. रत्नाकर गुट्टेवर औरंगाबाद सीआयडीने कारवाई केली आहे.  सीआयडीने अटक केल्यानंतर गंगाखेड न्यायालयानं गुट्टेचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे गुट्टेची कोठडीत रवानगी करण्यातत आली आहे. यापूर्वी तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हे तिघेही न्यायालयीन कोठडी भोगत असतांना न्यायालयाने आता गुट्टे आणि लेखापाल गायकवाड यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

रत्नाकर गुट्टेने विविध बँकेशी संगनमत करून कारखान्याला ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज काढून फसवणूक केल्याचा गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.  हा तपास औरंगाबाद सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान सभेत गुट्टे यांच्या अटकेसाठी आवाज उठवला होता. पण त्यांना अटक झाली नव्हती. 

रत्नाकर गुट्टे यांने २२ बोगस कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून २६ हजार शेतकऱ्यांना व बँकांना सुमारे ३०० कोटी रुपयांना फसवले आहे. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण २२ कंपन्या नोंदणीकृत केल्याचे एसआयटीच्या तपासात आढळून आले असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर असल्याचे उघडकीस आले आहे. 

रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्जे उचलली. यापोटी शेतकऱ्यांना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावून कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करूनही कारखान्याने या रकमा बँकांना परतफेड न केल्यामुळे या रकमा थकीत झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना २० ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी बँकांच्या नोटीस घरपोच गेल्या आणि हा घोटाळा उघडकीस पुढे आला.