उपोषणाच्या पाचव्या दिवशी अण्णांची प्रकृती ढासळली

 अण्णांच्या यकृतावर परिणाम झाला असून रक्तदाबाचाही त्रास

Updated: Feb 3, 2019, 12:08 PM IST
उपोषणाच्या पाचव्या दिवशी अण्णांची प्रकृती ढासळली title=

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू आहे. आज अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. महाराष्ट्रात लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारपासून अण्णांनी उपोषण सुरू केले. बुधवारपासून सुरू असलेल्या या उपोषणाने अण्णांची प्रकृती खालावली आहे.  अण्णांच्या यकृतावर परिणाम झाला असून रक्तदाबाचाही त्रास होत आहे. उपोषण सुरूचं राहिलं तर त्यांच्या मेंदू आणि किडनीवर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. गेल्या पाच दिवसांत अण्णांचे साडे तीन किलो वजन घटले असून डॉक्टरांकडून त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. 

सलग पाच दिवस होऊनही सरकार अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राळेगणसिद्दी येथील ग्रामस्थांनी केला आहे. राळेगणसिद्दी ग्रामस्थांकडून रास्ता रोको, तसेच बंदही पाळण्यात आला. लोकपाल आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणावेळी काही झाल्यास त्यास नरेंद्र मोदीच जबाबदार असतील असे अण्णांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. 

अण्णांनी अनेकदा पत्र पाठवूनही सरकार अनेकदा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. गेल्या ५ वर्षांत आण्णांनी सरकारला ३५ पत्रे पाठवली मात्र सरकारकडून केवळ दोन पत्रांची उत्तरं आली आहेत, ही बाब मांडत ग्रामस्थांनी परिस्थिती सर्वांसमोर उघड केली. दरम्यान, या मागण्या मान्य करण्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरीही राज्य किंवा केंद्र सरकारकडून मागण्यांबाबत कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे अण्णांनी सांगितले.