वनमंत्री संजय राठोड अखेर मौन सोडणार

बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर संजय राठोड मौन सोडणार

Updated: Feb 16, 2021, 05:25 PM IST
वनमंत्री संजय राठोड अखेर मौन सोडणार title=

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले वनमंत्री संजय राठोड अखेर मौन सोडणार आहेत. येत्या गुरुवारी 18 फेब्रुवारीला बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर, संजय राठोड येणार आहेत. तिथे ते बोलतील अशी माहिती, बंजारा समाजाचे गुरू सुनील महाराज यांनी दिली आहे. 

आठ दिवस उलटून गेले तरी संजय राठोड यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे राठोड सध्या नॉट रिचेबल आहेत. ते नेमकं कुठं गायब झालेत? अशी चर्चा आहे. टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या 22 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र ते दडून बसलेत.त्यांचा ठावठिकाणा कुणालाही नाही. ते नेमके आहेत कुठे, याचा शोध घेण्यासाठी झी २४ तासनं आधी त्यांचं यवतमाळचं घर गाठलं.

वनमंत्री संजय राठोड यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यावर सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईत आल्यानंतर ते जिथं राहतात, त्या ईरॉस टॉकिजजवळच्या इमारतीतील फ्लॅटवर झी 24 तासची टीम पोहोचली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव गोवण्यात आल्यापासून संजय राठोड मंत्रालयातील त्यांच्या दालनात देखील आलेले नाहीत.

दुसरीकडं राठोड यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेतूनही दबाव वाढतो आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि आमदार-खासदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. या बैठकीलाही राठोडांनी दांडी मारली. दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, असं सांगण्यात आलं.

दरम्यान, येत्या 18 फेब्रुवारीला संजय राठोड बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर येणार आहेत. त्यावेळी ते आपलं मौन सोडतील, असा दावा बंजारा समाजाचे गुरू सुनील महाराज यांनी केला आहे. आरोपांना सामोरे जाण्याऐवजी नॉट रिचेबल होणारे संजय राठोड आता या अवघड राजकीय पेचप्रसंगातून कशी वाट काढतात, याकडं तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.