चार तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी नवरी गजाआड

पैशांसाठी तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Updated: Jun 24, 2019, 05:38 PM IST
चार तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी नवरी गजाआड  title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : एखाद्या सिनेमाच्या कथानकाला साजेशी घटना मनमाड शहरात उघडकीस आली आहे. एका तरुणीने एक दोन नव्हे तर चक्क चार तरुणांबरोबर लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. या घटनेने फसवलेल्या नवरोबांची झोपच उडाली आहे. ही तरुणी पैशांसाठी नावे बदलून गुपचूप लग्न करायची. पण चौथ्या नवऱ्याने मात्र हा प्रकार ओळखला. य़ा तरुणाने संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे. पैशांसाठी तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मात्र एका लग्नाच्या गोष्टीला इथे पूर्णविराम मिळाला असला तरी अजून किती लोकांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करत आहे.

मनमाडमधील संभाजी नगर येथील रहिवासी अशोक जगन्नाथ डोंगरे यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. यातच त्यांची ओळख लातूरमधील अहमदपूरच्या पूजा भागवत गुळे सोबत झाली. या महिलेने म्हटलं की, माझ्या बघण्यात एक मुलगी आहे, पण ते गरीब असल्याने तुम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून तिने बंडू नामदेव केंद्रे यांची मुलगी ज्योती हिच्याशी विवाह लावून दिला. यात ४० हजार रुपये रोख व ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार रुपये खर्च दिला गेला. लग्न झाल्यानंतर १४ दिवस ज्योती येथे राहिली. त्यानंतर ती माहेरी गेली. काही दिवसांनी अशोक डोंगरे हे त्यांच्या मुलाला घेऊन ज्योतीला आणण्यासाठी गेले. त्यावेळी सागर पालवे या तरुणाशी ज्योतीचा विवाह होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

हा प्रकार पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बंडू नामदेव केंद्रे, त्याची पत्नी विमल बंडू केंद्रे, मुलगी ज्योती आणि मध्यस्थी पूजा भागवत गुळे आणि विठ्ठल पांडुरंग मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व घटनेची माहिती घेत प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी वरिष्ठांना माहिती देत वरील सर्वांवर फसवणूक यासह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली.

केंद्रे आणि मध्यस्थी मनमाड येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून या टोळीला शिताफीने अटक केली. याबाबत अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खैरनार करत आहे. चौकशीत 4 जणांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आहे. पण या चार जणांव्यतिरिक्त अजून किती जणांना फसवलं आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.