गणेशोत्सवाला गालबोट; गणपती विसर्जनावेळी तीन तरुण बुडाले

Ganeshotsav 2023 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान विसर्जनावेळी बुडून तीन तरुणांनी प्राण गमावले आहेत.या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 29, 2023, 08:00 AM IST
गणेशोत्सवाला गालबोट; गणपती विसर्जनावेळी तीन तरुण बुडाले title=

Ganeshotsav 2023 : राज्यात मोठ्या उत्साहात गुरुवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी गणेशोत्सवाला (Ganeshotsav) गालबोट लागलं आहे. यवतमाळमध्ये (Yavatmal) एक तर नाशिकमध्ये (Nashik) तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरी खुर्द येथील हितेश पंचबुद्धे या युवकाचा गणपती विसर्जन दरम्यान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. हितेश गणपती विसर्जना करता अडाण नदीवर गेला असता तो नदीपात्रात तोल जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने दारव्हा येथे शासकीय दवाखान्यात व त्यानंतर यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, नाशिकरोड येथे गणपती विसर्जनाला गालबोट लागले. वालदेवी नदी पत्रात तीन जणांचा बुडून मृत्यु झाला असून त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे. सिन्नर फाटा चेहडी शिव येथील एम्पायर मार्वेल या इमराती मधील सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी प्रसाद सुनील दराडे हा त्याचा मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे याच्यासह चेहडी येथील संगमेशर येथे गेला होता. यावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पोहता येत नसल्याने पाण्यात तो बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण डुबून वाहून गेले.

तर दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर येथे घडली आहे. दुपारी भविक वडनेर येथे वालदेवी नदी घाटावर गणपती विसर्जन करीत असतांना महादेव मंदिर, लहानपुला जवळ हेमंत कैलास सातपुते हा विवाहित तरुण वालदेवी नदी पत्रात बुडाला. जवान नदी पत्रात त्याचा शोध घेत आहे. मात्र पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने व रात्र झाल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन महाविद्यालय तर एक विवाहित तरुणचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच बरोबर नाशिकच्या पंचवटी मधील गोदाघाटा वर असलेल्या गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या नदी पात्रात देखील दोन जण बुडाले आहे. गणपती विसर्जनासाठी पाण्यात पोहोण्यासाठी गेले होते. त्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशमधील असल्याचं कळत आहे.