बीडमध्ये पावसाची दमदार हजेरी

  मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास बीड जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. 

Updated: Jun 5, 2018, 09:04 PM IST
बीडमध्ये पावसाची दमदार हजेरी title=

बीड :  मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास बीड जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील 3 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या महसूल मंडळात एका रात्रीत 63 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. माजलगाव महसूल मंडळात 70 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे तर अंबाजोगाई महसूल मंडळात 70 मि.मी. तसेच याच तालुक्यातील लोखंडी सावरगाव महसूल मंडळात तब्बल 77 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. 63 मि.मी.पेक्षा जास्त होणारा पाऊस अतिवृष्टी मानला जातो. मुसळधार पावसामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता खरीपाच्या तयारीलाही वेग येणार आहे.  दरम्यान परळीत पहिल्याच पावसात महावितरण कंपनीचे पितळ उघडं पडलंय.. पावसादरम्यान पहाटे 2 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. पहिल्याच पावसात अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण झाल्याने यंदा पाऊस कसा होईल याची प्रचिती येवू लागली आहे.