वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात पावसाने आज जोरदार एन्ट्री केली.

Updated: Jun 28, 2019, 07:49 PM IST
वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस title=

जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात पावसाने आज जोरदार एन्ट्री केली. दुपारी ३ च्या दरम्यान गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंझरा, पिंप्री अवगण या गावात ढगफुटी सदृश्य धो धो पाऊस कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला तर अचानकपणे कोसळल्याने पावसामुळे पेरणी केलेली बी बियाणे वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच बर्‍याच शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटले.

मंगरुळपीर शेलूबाजार दरम्यान राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाच्या वतीने नव्याने रस्त्याचे काम सुरु आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नाल्याच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. पुलाचे काम करते वेळी वाहतुकीसाठी योग्यरित्या पर्यायी रस्ता तयार करण्यात आला नाही. त्यामुळे आज पहिल्याच पुरामुळे दुपारी ४ वाजेपासून मंगरुळपीर मार्गीवरील वाहतुकीचा खोळंबा झाला. 

संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारक आणि ये-जा करणार्‍या नागरिकांना प्रचंड त्रास सहन कराव लागला. अडान नदी व खंड्या नाल्याला आलेल्या पुरामुळे नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पुलाला धक्का बसण्याची भीती नाकारता येत नाही.