मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

  मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे. 

Updated: Aug 8, 2018, 09:45 PM IST
मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त title=

मुंबई, पुणे, औरंगाबाद :  मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यातले सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. नवी मुंबईत मराठा आंदोलन मागे घेतलं असलं तरी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात भाजीपाला जाऊ शकणार नाही. 

आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने पुण्यातल्या टिळक चौकात स्टंट आंदोलन करण्यात आलं. यासाठी चक्क स्टंट करणाऱ्या दुचाकीस्वारांना पाचारण करण्यात आलं. मेधा कुलकर्णी यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला स्टंट म्हटल्यामुळे खरी स्टंटबाजी काय असते हे दाखवण्यासाठी चित्रपटाप्रमाणे दुचाकीवरून विविध स्टंट करण्यात आले. 

काळ्या फिती लावून आंदोलन

मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. तर पुणे पालिकेच्या सर्व शाळा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे पालिकेनं याबाबतचा तसा आदेश काढलाय. 

औरंगाबाद जिल्ह्यात चोख सुरक्षा व्यवस्था

मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारच्या बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शाळा तसंच महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पालक आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामीण भागात एसटी सेवा बंद ठेवावी अशा प्रकारची सूचना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एसटी महामंडळाला केलीय. गेल्या आंदोलनात एसटी बसेसचं नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवर अशाप्रकारची सूचना करण्यात आलीय. मात्र याबाबत एसटी महामंडळाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरात सुद्धा चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती शहर पोलिसानी दिलीये, बंद शांततेत करावा असे आवाहन पोलिसांनी केलंय. 

'रत्नागिरीत दुकाने सुरुच राहणार'

सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या रत्नागिरी बंदची हाक दिली आहे. व्यापारी संघटनेचा दुकाने बंद ठेवण्याला विरोध केलाय. व्यापारी संघ आणि मराठा समाज यांच्या मागील बैठकीत मराठा समाजाने ९ तारखेच्या बंदला आम्ही तुम्हाला बंद ठेवण्यासाठी सांगणार नाही, असे वचन दिले होते, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उदय पेठे यांनी दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व्यापार चालवत असताना वारंवार दुकाने बंद ठेवणे आम्हाला शक्य नसल्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, असे ते म्हणालेत. त्यामुळे रत्नागिरी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आंदोलन मागे घेतले ही निव्वळ अफवा 

परळीतील मराठा समाजाचे २१ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन मागे घेतले ही निव्वळ अफवा असल्याचा आरोप लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने केलाय. त्यामुळे या अफवांवर मराठा आंदोलकांनी विश्वास ठेऊ नये आणि ९ ऑगस्टचं आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलंय. अशा अफवा पसरवण्यामागे राज्य सरकारचा हात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केलाय. परळीत जे समन्वयक मराठा आंदोलनातून उठले त्यांचा आणि मराठा क्रांती मोर्चा कुठलाही संबंध नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान लातूर जिल्ह्यासह राज्यात होणारे मराठा आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आलं. मराठा आंदोलकांनी आत्महत्या न करण्याचे आवाहनही लातूरमधील पत्रकार परिषदेत करण्यात आले. 

अमरावती शहरात मोटारसायकल रॅली 

सकल मराठा समाजाच्या वतीने ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातून मोटारसायकल रॅली काढून शहरातील व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन केलंय. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलीय. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय.