मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी

History behind Marathi language name : मराठी भाषा काळानुरूप बदलली आणि या भाषेचं नावही तसंच काहीसं बदललं. याच मराठी भाषेचं हे नाव कुठून आलं माहितीये?   

सायली पाटील | Updated: Mar 13, 2024, 01:58 PM IST
मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी  title=
How does the Marathi language got its name know inetersing context from past

History behind Marathi language name : 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...' या ओळींचा उच्चार करत असताना नकळतच आपण किती नशिबवान आहोत ही भावनाच सर्वकाही सांगून जाते. या भाषेचं आपल्याशी असणारं नातं नेमकं किती घनिष्ट आहे याची प्रचिती करून देणाऱ्या या ओळी कमाल आहेतच. पण, त्यातून नेमका भाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी ही मराठी भाषाच मुळात कमाल आहे हे विसरून चालणार नाही. किंबहुना हे भाग्य या भाषेनंच आपल्याला दिसलं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 

मराठी भाषेचं वय नेमकं किती असेल? ती उदयास आली तरी कशी? भाषेचा मतितार्थ समजवणाऱ्या विद्वानांनी तिचा अभ्यास नेमका कसा केला? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात घर करतात. मुळात महाराष्ट्राची राज्यभाषा असणाऱ्य़ा या मराठी भाषेला मराठी हे नाव कुठून मिळालं, या नावाच जन्म कसा झाला.... काही माहितीये? 

मराठी भाषेच्या नावामागचा इतिहास लक्षात ठेवण्याजोगा... 

आठव्या शतकाच्या शेवटी लिहिल्या गेलेल्या 'कुवलयमाला कथा' नावाच्या ग्रंथात जवळपास 18 देशी भाषांचा उल्लेख करण्यात आल्याचं आढळतं. त्या भाषांमध्ये 'मरहट्ट' नावाचीही एक भाषा आहे. मरहट्ट जनसमुदाय आणि त्यांच्या भाषेच्या वर्णनासाठी 'दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कळहसीले य| दिण्णले गहिल्ले उल्लाविरे तत्थ मरहट्टे' असं लिहिल्याचं आढळतं. 

मराठीच्या उदयाची पाळंमुळं इसवीसन 859 मध्ये घेऊन जातात. जिथं 'धर्मोपदेशमाला' ग्रांथमध्येही 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आढळतो. हे उल्लेख पाहता मराठी भाषेला प्राचीन काळात 'मरहट्ट' म्हटलं जात होतं असं प्रतित होतं. मराठी भाषेच्या नावाचा उल्लेख यादवकालीन साहित्यामध्येही करण्यात आला जिथं या भाषेसाठी 'मऱ्हाटी' असा शब्द वापरला गेल्याचं सांगितलं जातं. मऱ्हाटीसोबतच त्या काळात मराठी भाषेसाठी असणारं दुसरं नाव म्हणजे 'देशी'. महानुभव पंथांचे ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचा उल्लेख असाच आढळतो. 

हेसुद्धा वाचा : Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? अर्ज नोंदणी सुरु झालीय, तुमचं लक्ष कुठंय? त्वरा करा... 

काळ पुढे गेला आणि मऱ्हाटीचे बहुविध उच्चार केले जाऊ लागले. पुढे 'ऱ्ह' शेवटच्या 'टी'ला जोडला जाऊ लागला आणि त्यातूनच उदयास आलेला शब्द ठरला 'मराठी'. मराठी भाषेच्या आणि त्याहूनही या भाषेला मराठी हे नाव मिळण्यामागंही अनेक संदर्भ आहेत.

आणखी एक संदर्भ... 

सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार मराठी हा शब्द महाराष्ट्र या शब्दाच्या अपभ्रंशातुनही आल्याचं काहींचं म्हणंणं. मध्यप्रदेशातील एरण येथे सुमारे इ.स. चौथ्या शतकातील शिलालेख सापडला होता. त्यात सर्वप्रथम 'महाराष्ट्र' या नावाचा उल्लेख आढळला होता. हा शिलालेख शक राजा श्रीधरवर्मा याचा सेनापती सत्यनाग याने युद्धात मरण पावलेल्या नाग लोकांच्या स्मरणार्थ उभारला होता. विशेष म्हणजे या लेखात सत्यनाग याने तो 'माहाराष्ट्र' म्हणजे महाराष्ट्रचा रहिवासी असल्याचं सांगितलं होतं. यावरूनच प्राचीन महाराषट्रात नाग लोकांची वस्ती होती असं मानलं जातं.