वादामुळे होत्याचं नव्हतं झालं : पत्नी, मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही मृतदेह ठेवले लपून 

Updated: Jul 3, 2021, 10:07 AM IST
वादामुळे होत्याचं नव्हतं झालं : पत्नी, मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पत्नीची आणि आपल्या 16 वर्षीय मुलीची हत्या करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना अमरावतीच्या दर्यापुर तालुक्यातील भामोद या गावात उघडकीस आली आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला आहे. भामोद येथे एका इसमाने पत्नी व १६ वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख वय (४५) याने आपली पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून काहीतरी गंभीर घटना घडल्याचा अंदाज नागरिकांनी आला आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी अनिल देशमुख यांच्या घरी पाहणी केली असता पलंगाखाली १६ वर्षीय मुलगी साक्षी अनिल देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा लागलेल्या दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंध आल्याने पोलिसांचा संशय बळावला. कपाट उघडले असता त्यातून देशमुख यांची पत्नी वंदना देशमुख (४०) यांचा मृतदेह आढळून आला. याच वेळी घरातील मागच्या एका खोलीत अनिल देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यासंदर्भात माहिती देताना येवला पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री बच्छाव यांनी सांगितलं की, ही घटना मागील दोन तीन दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अचूक माहिती कळू शकेल. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले आहे. अनिल देशमुख सातत्याने दारूच्या नशेत राहत असल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडे मिळालेल्या सुसाईड नोटमधून त्यांनी कौटुंबिक कलहातून पत्नी व मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

आत्महत्येला कौटुंबिक वाद कारणीभूत....

भामोद येथील ही घटना कौटुंबिक वाद आणि संशयावरून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. मृत अनिल देशमुख हा व्यसनी होता. कोरोना काळात मालवाहू वाहनाचा व्यवसाय ठप्प पडल्याने तो बेरोजगार देखील झाला होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे

दोनही मृतदेह ठेवले होते दडवून....

पोलिसांनी अनिल देशमुख याच्या घरी पाहणी केली असता पलंगाखाली १६ वर्षीय मुलगी साक्षी अनिल देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा लागलेल्या दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंध आल्याने पोलिसांचा संशय बळावला. कपाट उघडले असता त्यातून देशमुख यांची पत्नी वंदना देशमुख (४०) यांचा मृतदेह आढळून आला.