राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान; अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पाऊस

weather report | राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

Updated: Apr 24, 2022, 10:12 AM IST
राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान; अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पाऊस title=

मुंबई : राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार आज अनेक ठिकाणी पाऊसही झाला. तर त्यानंतर 25 ते 27 तारखेपर्यंत राज्यातल्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर 25 ते 27 एप्रिलपर्यंत विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळसह, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार आहे.

यवतमाळ

यवतमाळमध्ये उन्हाचा कडाका वाढत असतानाच आज दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अर्धातास पाऊस  बरसल्याने काहीवेळ उकाड्यातून दिलासा मिळाला. यंदाचा उन्हाळा यवतमाळकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंशापलीकडे गेला. पारा 44 अंशावर असताना अचानक पावसानं हजेरी लावली.

वाशिम

वाशिममध्ये गेल्या आठवड्यापासून तापमान 42अंश सेल्सिअसवर पोहचलं असताना 
शनिवारी संध्याकाळी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. विजेच्या कडकडाटांसह अचानक अवकाळी पाऊस झाला.

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात दुपारनंतर अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील चिमूर आणि कोरपना तालुक्यात काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार पाऊस झाला. चंद्रपूरमध्ये 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे.  पावसामूळे तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

पुणे

मावळात पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण पहायला मिळाले. दुपारनंतर मावळच्या काही भागात ऊन पावसाचा खेळ पहायला मिळाला. मागील अनेक दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. पावसामुळे दिलासा मिळाला. कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसामुळे धावपळ झाल्याचे पहायला मिळाले.