नववधूने संपवली जीवन यात्रा, तीन महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह

तीन महिन्यांपूर्वीच महिलेने प्रेमविवाह केला होता

Updated: Aug 1, 2022, 08:52 PM IST
नववधूने संपवली जीवन यात्रा, तीन महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यात नववधूने आपला जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास नाशिकमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी तिच्या कुटुंबीयांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी हलविला. मात्र तो प्रवेशद्वारावरच ठेवून जोपर्यंत सासरच्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले आणि त्या मुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. पंचवटी परिसरातील रामवाडी येथे महिलेचे माहेर आहे. तर जुने नाशिकमधील खैरे गल्लीतील दीक्षित चाळीत या महिलेचे सासर होते. महिलेने शनिवारी रात्री सासरी राहत्या घरी लाकडी आढ्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

हा प्रकार सासरच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रविवारी सकाळच्या सुमारास  तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातून ताब्यात घेत घरी नेला. तेथून अंत्ययात्रा पंचवटीतील अमरधाममध्ये आणण्यात आली. या ठिकाणी मृतदेह सरणावर ठेवण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच ठेवून कुटुंबीयांनी संताप व्यक्त करण्यास सुरवात केली.

जोपर्यंत सासरच्या लोकांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्राच महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला. यावेळी शोकाकुल कुटुंबीयांची पोलिसांनी समजूत काढली आणि त्यानंतर मृतदेह अमरधाममध्ये घेऊन जात अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी याप्रकरणी  सासरच्या काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत.