चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा

Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल गाड्या सोडणार आहेत. पाहा वेळापत्रक 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 25, 2023, 04:18 PM IST
चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा  title=
Indian Railways to run 248 Ganpati Special trains in kokan

Special Trains During Ganpati Festival: गणेशोत्सव हा कोकणातल्या रहिवाशांसाठी जिव्हाळ्याचा सण असतो. मुंबईसह इतर शहरात राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत असतात. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्यासाठीच रेल्वे प्रशासनाकडून कोकणात स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने कोकण मार्गावर 40 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गणेशोत्सव काळात विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या 248 वर पोहोचली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी 52 गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता पश्चिम रेल्वेनेही 40 गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना या मार्गावर वसई पनवेल रोहा मार्गे आणि विश्वामित्री कुडाळ या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.

मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी विशेष एक्स्प्रेसच्या ३० फेऱ्या धावणार आहेत. 14 ते 18 आणि 20 ते 30 सप्टेंबर यादरम्यान ही गाडी मुंबई सेंट्रल येथून सोमवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवार, रविवारी रात्री 12 वाजता सुटणार आहे. तर, परतीच्या प्रवासाठी 15 ते 19 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर ते 1 ओक्टोबरपर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी पहाटे पाच वाजता ही गाडी सुटणार आहे. 

विशेष गाड्यांचे वेळापत्रक

उधना ते मडगाव (सहा फेऱ्या) आणि विश्वामित्री ते कुडाळ (चार फेऱ्या) या गाड्या चालवण्यात येणार आहेत. विशेष रेल्वेचे थांबे हे पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे असणार आहेत. 

गाडी क्रमांक 09018/ 09017- उधना - मडगाव जं.ही साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार 15,22,29 सप्टेंबरला दुपारी 15:25 ला सुटणार आहे. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. 

गाडी क्र. 09017 मडगाव जं. - उधना (साप्ताहिक) विशेष गाडी मडगाव जंक्शनहून शनिवार 16, 23 आणि 30 सप्टेंबरला सकाळी 10:20 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी उधनाला पहाटे ५ वाजता पोहोचेल.