एकाच दिवशी 5 वंदे भारत ट्रेन्सला मिळणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथ्या ट्रेनचं गिफ्ट

Indian Railways to start 5 Vande Bharat Trains: सध्या भारतामध्ये एकूण 18 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात. यामध्ये आता आणखीन 5 मार्गांचा भर पडणार आहे. विशेष म्हणजे यापैकी एक ट्रेन महाराष्ट्रामधील महत्वाच्या मार्गावर सुरु होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 14, 2023, 06:53 PM IST
एकाच दिवशी 5 वंदे भारत ट्रेन्सला मिळणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथ्या ट्रेनचं गिफ्ट title=
सध्या देशात एकूण 18 मार्गांवर धावत आहेत वंदे भारत ट्रेन्स

Indian Railways to start 5 Vande Bharat Trains: भारतीय रेल्वेने (Indian Railway) 5 वंदे भारत ट्रेन्स (Vande Bharat Train) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या 5 ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहेत हे सुद्धा निश्चित करण्यात आलं असून उद्घाटनाची तारीखही ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून 26 जून रोजी 5 ट्रेन्सला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाईल. मोदी प्रत्यक्षात एका जागी उपस्थित राहून अन्य 4 जागांवरील ट्रेन्सला व्हर्ल्यूअल माध्यमातून झेंडा दाखवणार आहे. या 5 वंदे भारत ट्रेन्सपैकी एक ट्रेन महाराष्ट्रात धावणार आहे. महाराष्ट्राला मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन ठरणार आहे. यापूर्वी 2 पूर्णपणे महाराष्ट्रात धावणाऱ्या तर एक महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात.

'या' राज्यांमध्ये पहिल्यांदाच धावणार वंदे भारत

भारतीय रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ ते इंदूर, भोपाळ ते जबलपुर, पाटणा ते रांची, बेंगळुरु ते हुबळी आणि गोवा ते मुंबई या 5 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावणार आहेत. सध्या भारतामध्ये 18 वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. नव्याने सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेन्समुळे पहिल्यांदाच 3 राज्यांमध्ये या ट्रेन्स धावणार आहेत. 26 जूनला पहिल्यांदाच गोवा, झारखंड आणि बिहारमध्ये वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ईशान्य भारतामधील केवळ आसाममध्ये वंदे भारत ट्रेन धावते. ईशान्य भारतातील रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या राज्यांमध्येही वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील असं सांगितलं जात आहे.

सध्या या मार्गावर धावतात वंदे भारत ट्रेन्स

देशातील सर्वात पहिली वंदे भारत ट्रेन 2019 मध्ये धावली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही ट्रेन धावली. तर दुसरी वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वैष्णो देवी कटरा मार्गावर चालवण्यात आली. तिसरी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गांधीनगर मार्गावर चालवली गेली. चौथी ट्रेन नवी दिल्ली ते हिमाचलमधील अंब अंदौरा मार्गावर धावली. पाचवी वंदे भारत ट्रेन चेन्नई ते मैसूरदरम्यान धावली. सहावी वंदे भारत नागपूर ते बिलासपूरदरम्यान धावली. सातवी वंदे भारत ट्रेन हावडा ते न्यू जलपायगुडीदरम्यान धावली. आठव्या वंदे भारतने सिंकदाराबाद ते विशाखापट्टनम शहरं जोडण्यात आली. पूर्णपणे महाराष्ट्रातून धावाणारी वंदे भारतची 9 वी ट्रेन मुंबई सोलापूर मार्गावर तर 10 वी ट्रेन मुंबई ते शिर्डी मार्गावर धावाली. 11 वी वंदे भारत ट्रेन रानी कमलापति स्टेशन (भोपाळ) ते निजामुद्दीनदरम्यान, 12 वी सिकंदराबाद ते तिरुपतीदरम्यान धावली. तसेच 13 व्या वंदे भारत ट्रेनचा मार्ग चेन्नई ते कोइम्बतूर असा होता. 14 वी वंदे भारत दिल्ली ते अझमेर दरम्यान तर 15 वी वंदे भारत तिरुअंतपुरम ते कासरगोडदरम्यान धावली. 16 वी वंदे भारत भुवनेश्वर ते हावडादरम्यान, 17 वी वंदे भारत दिल्ली ते देहरादूनदरम्यान आणि नुकतीच सुरु झालेली 18 वी वंदे भारत ट्रेन जलपायगुडी ते गुवाहाटीदरम्यान धावते.

महाराष्ट्रातील चौथी ट्रेन

मुंबई-गोवा वंदे भारत ही महाराष्ट्रातील चौथी वंदे भारत ट्रेन ठरणार आहे. यापूर्वी 2 पूर्णपणे राज्यातील शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत सुरु झाल्या आहेत. तर एक वंदे भारत ट्रेन बिलासपूरवरुन महाराष्ट्रातील नागपूरदरम्यान धावते. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचं उदघाटन 3 जून रोजी होणार होतं. मात्र ओडिशामधील ट्रेन अपघातानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.