जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

पुण्यात राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने स्टेजवर गोंधळ घातला. ही घटना ताजी असतानाच जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांना गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली.

Updated: Oct 20, 2023, 05:39 PM IST
जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की title=

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या (Raosaheb Danve) कार्यक्रमात मराठा आंदोलक (Maratha Protesters) आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. बदनापूरमध्ये 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं.. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) आणि मंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती लावली.. मात्र काल मराठा आंदोलकाच्या आत्महत्येनंतर हा कार्यक्रम करू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून समज देवून सोडलं. आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.

जरागेंचा धसका, पुढाऱ्यांना फटका
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वपक्षीय पुढाऱ्यांची कोंडी होतेय.. अनेक आमदारांनी जरांगेंची तक्रार पक्षनेतृत्वाकडे केल्याचं समजतंय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत अनेक गावात आमदार-खासदारांना गावबंदी करण्यात आलीय..अंबड तालुक्यातील भांबेरी ग्रामस्थांनी आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना भांबेरी ग्रामस्थांनी गावबंदी केलीय तर अशाच पद्धतीचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूल तालुक्यातल्या भायगाव गंगा गावातल्या नागरिकांनी घेतलाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदीचा निर्णय गावाच्या दर्शनीच लावण्यात आलाय.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार-खासदारांना प्रवेश न देण्याचा अनेक गावांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार-खासदारांसह पुढाऱ्यांचे गावातील दौरे रद्द झाले आहेत. आमदार, खासदारांचे राजकीय कार्यक्रम बंद झालेत. ओबीसीतून मराठा आरक्षण दिल्यास वेगळाच रोष निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जातेय.

काका-पुतण्यांना प्रवेशबंदी
मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange-Patil) घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता पवार काका-पुतण्यांनाही बसलीय. येत्या 23 ऑक्टोबरला सोलापुरात पिंपळनेर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र अजित पवारांना पिंपळनेरमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजानं घेतलीय. तर त्याचदिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडीत शरद पवार (Sharad Pawar) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र पवारच काय, कुणाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. बारामतीनंतर शरद पवारांचं सर्वाधिक प्रेम आहे ते सोलापूर जिल्ह्यावर. 2009 मध्ये पवार माढामधून खासदार झाले होते. आता त्याच जिल्ह्यात पवारांना प्रवेशबंदीचा इशारा दिला गेलाय.

मनोज जरांगे-पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला आठवडाही उरलेला नाही. सरकार आरक्षण देणार कसं याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही. त्यातच आरक्षण मिळेपर्यंत गावबंदीचा निर्णय अनेक गावांनी घेतलाय.. त्यामुळे निवडणुका उंबरठ्यावर असताना आमदार-खासदारांची मात्र चांगलीच गोची झालेली पाहायला मिळतेय..