Jitendra Awhad यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा! म्हणाले, 'शरद पवारांबद्दल बोलताना...'

Jitendra Awhad Indirect Dig At Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेबरोबर युतीची घोषणा केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांवरुन अप्रत्यक्षपणे देण्यात आला इशारा

Updated: Jan 26, 2023, 02:44 PM IST
Jitendra Awhad यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा! म्हणाले, 'शरद पवारांबद्दल बोलताना...' title=
Uddhav Prakash ambedkar

Jitendra Awhad Indirect Dig At Prakash Ambedkar: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जयंतीच्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) युतीची घोषणा करण्यात आली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपा आणि शिंदे गटासहीत महाविकास आघाडीमधील नेत्यांवरही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. यावर आता राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलं आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेबरोबर युती असली तरी ते महाविकास आघाडीचा भाग आहेत की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. अशातच आता राष्ट्रवादीने पवारांवरील विधानावरुन इशारा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे आमदार आणि पवारांचे निकटवर्तीय असलेल्या आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार हे भाजपाबरोबर असल्याचा टोला लगावला होता. यावेळेस आंबेडकर यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत या शपथविधीनंतर अजित पवारांची मुलाखत छापून आलेली ज्यामध्ये त्यांनी लोक मला का दोष देत आहेत समजत नाही, हे आमच्या पक्षांचे ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो, असं म्हटल्याचा दावा केला आहे. याच टीकेवरुन आता जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला आहे.

आव्हाड यांनी काय इशारा दिला?

"महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं," असं आव्ह्डांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी, "मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी," असंही म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या ट्वीटमध्ये शेवटी, "सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही," असंही म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवसेनेची साथ दिली

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवरुन भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू होती. ही हटवण्यासाठी ही खेळी असू शकते असं सांगताना नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्याची आठवण करुन दिली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे नाही तर शिवसेनेचे आमदार सोडून गेल्याने सरकार कोसळल्याचा उल्लेख करताना राष्ट्रवादीने शिवसेनेला अगदी शेवटपर्यंत साथ दिल्याचंही पाटील म्हणाले.