Karnataka Election: मराठी आमदारच निवडून आणा, गळचेपी खपवून घेणार नाही; राज ठाकरेंनी खडसावलं

Karnataka Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election) पार्श्वभूमीवर सीमाभागातील नागरिकांना मराठी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 8, 2023, 12:51 PM IST
Karnataka Election: मराठी आमदारच निवडून आणा, गळचेपी खपवून घेणार नाही; राज ठाकरेंनी खडसावलं title=

Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बेळगावमध्ये (Belgaon) सीमाभागातही निवडणुकीची तयारी सुरु असून यामुळे महाराष्ट्राचंही निवडणुकीकडे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सीमाभागातील नागरिकांना आवाहन केलं आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे आवाहन केलं आहे. 

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

"कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 

"तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे.  सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही," असं राज ठाकरेंनी खडसावलं आहे. 

  
"मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हटलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजपात थेट चुरस असून मतदार कोणत्या पक्षाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे.