शरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?

Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत होऊन निवडणूक रंगतदार होईल असं वाटत असतानाच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 1, 2024, 09:23 AM IST
शरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी? title=
शरद पवार गटाचा वेगळीच खेळी

Loksabha Election 2024 Satara Constituency: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. प्रकृतीचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निडणुकीचं तिकीट नाकारलं आहे. या जागेवर भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच या मतदारसंघामध्ये प्रबळ दावेदार देण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. खुद्द शरद पवार या ठिकाणी निवडणुकीला उभे राहणार की अशी चर्चाही मतदारसंघात रंगली आहे. असं असतानाच आता शरद पवार महाविकास आघाडीचा विचार करुन वेगळीच खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचसंदर्भात काल एक महत्त्वाची बैठक पार पडली.

कोण आहे हा नेता?

उदयनराजेंना तगडे आव्हान देण्याच्या दृष्टीने साताऱ्यातून उमेदवार उभा करताना राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याऐवजी मतदारसंघाचे महत्त्व लक्षात घेत थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी सुरु आहे. साताऱ्यातून ज्या नेत्याला निवडणूक लढण्याची गळ शरद पवार गटाकडून घतली जाण्याची शक्यता आहे त्या नेत्याचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण! शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीनिवास पाटील यांनी आजारपणाचे कारण देत अनपेक्षितपणे निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्याचवेळी शरद पवार गटातील मतभिन्नतेमुळे श्रीनिवास पाटलांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अशातच विश्वासाचा आणि मोठं नाव असलेला उमेदवार या ठिकाणी देण्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे.  उद्यनराजेंच्या उमेदवारीला महाविकास आघाडीकडून तगडं आव्हान देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा पर्याय भाजपासाठी अडचणींचा असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे.

रविवारी कराडमध्ये काय घडलं?

जयंत पाटील रविवारी कराडमधील पृथ्वीराज चव्हाणांच्या निवासस्थानी दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरु होती. पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, असं शरद पवार गटाचं म्हणणं असून आपली बाजू मांडण्यासाठी पक्षाने जयंत पाटील यांना चव्हाणांशी चर्चा करण्यासाठी पाठवल्याचं सूत्रांचे म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांसारख्या उच्च शिक्षित आणि प्रशासनाची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारीची मागणी केली होती. असं असतानाच रविवारी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळालं आहे. चव्हाण शरद पवार गटाची ही ऑफर स्वीकारतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मात्र चव्हाण या ठिकाणी शरद पवार गटाच्या मागणीनुसार उभे राहिले तर शरद पवारांचा दबदाब असलेल्या या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार देऊन तो निवडणून आणण्याचा नवा पॅटर्न या माध्यमातून तयार होईल.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा

शरद पवारांबरोबर 3 ते 4 तास चर्चा

इंडिया आघाडीच्या मेळाव्याच्या वेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा मतदारसंघासंदर्भात सूचक विधान केलं. साताऱ्या सारख्या महत्त्वाच्या मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी विचाराचा खासदार नको यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरु असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. साताऱ्यामध्ये प्रबळ उमेदवार देण्यासंदर्भात आपण शरद पवारांबरोबर जवळ पाच 3 ते 4 तास चर्चा केल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या ठिकाणी दमदार उमेदवार देण्याचा इंडिया आघाडीचा पूर्ण प्रयत्न असल्याचंही पृथ्वीराज चव्हाणांनी अधोरेखित केलेलं.

शरद पवार गटातील कोणती नवं चर्चेत?

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सातारा दौऱ्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोणाला उमेदवारी द्यावी यासंदर्भात चाचपणी करण्यासाठी घेतलेल्या आढावा बैठकींमध्ये शरद पवारांच्या नावाचाच आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी 2 ते 3 दिवसात उमेदवारीचा तिढा सोडवू असं सांगितलं होतं. सध्या तरी शरद पवार गटाचा विचार केला तर साताऱ्यामधून 3 नावांची चर्चा आहे. यामध्ये राज्याचे माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा समावेश आहे. मात्र यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर केवळ शरद पवारांच्या नावावर या तिघांपैकी कोणालाही किती मतं पडतील याबद्दल शंकाच आहे. त्यातच समोर उदयनराजेंसारखा उमेदवार असल्याने हे तिन्ही दुसऱ्या फळीतील नेते किती आव्हान देऊ शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.