'आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची...', CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: राज ठाकरे (Raj Thackeray) मोठ्या मनाचा माणूस, कोत्या मनाचे नाहीत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते.   

शिवराज यादव | Updated: May 6, 2024, 02:27 PM IST
'आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची...', CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट title=

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटायलो गेलो तेव्हा त्यांनी त्यांच्या संपत्तीबद्दल विचारणा केली होती असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) मोठ्या मनाचा माणूस असून कोत्या मनाचे नाहीत असं सांगत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. 

"महायुती 48 जागा लढत आहे. मी सगळीकडे फिरत आहे. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं आहे, ते पाहता महायुती प्रचंड मतांनी विजयी होणार असा मला विश्वास आहे. 45, 46 डिग्री तापमान असतानाही कार्यकर्ते राबत होते. मतदारांना केंद्राबाहेर ते मदत करत होते. मतांचा टक्का वाढवण्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे," असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं. "मनसेचे लोक मनापासून काम करत आहेत. राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस आहे. ते रोखठोक बोलतात. पोटात एक आणि ओठात एक असं नाही. ते कोत्या नाही तर मोठ्या मनाचे माणूस आहेत. एकदा करतो म्हणाल्यानंतर ते करतातच," असं एकनात शिंदेंनी सांगितलं.  

"महायुतीने 2 वर्षांत केलेली कामं लोकांसमोर आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याने सर्वसामान्य घटकांना न्याय दिला आहे. नरेंद्र मोदींनी विकास करत देशाला प्रगतीपथावर नेलं असून त्याचा मी साक्षीदार आहे. मी दावोसला गेलो तेव्हा तिथे अनेक देशाचे पंतप्रधान, मंत्री भेटले. तेव्हा ते मला नरेंद्र मोदी आणि तुमचे कसे संबंध आहेत विचारायचे. तेव्हा मी त्यांना आम्ही एक असून, त्यांच्यात नेतृत्वात आम्ही काम करत असल्याचं सांगायचो," असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले की "औदसा आठवली आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात आईचं दूध विकणारे लोक, टोळी असे शब्द वापरले. मला राज्यसभा, विधानपरिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आलं. तुम्ही मला ओळखलं नाही. मी ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो. बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही असं मला पत्नीने सांगितलं.  मी मंत्रिमंडळात असताना एका केसमध्ये अडकवण्याचे काम मागचं सरकार करत होतं. मग मी कसा काय थांबलो असतो. राजकीय अस्तित्व संपवणं सोपं नसतं". 

"राजन विचारेबाबत सिनेमात दाखवलं ते खोटं"

"आनंद दिघेंनी मला उभं केलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले. पण राजन विचारेंबाबत सिनेमात दाखवलं ते खोटं होतं. राजन विचारे स्वत:हून आले आणि राजीनामा दिला असं काही नव्हतं. दुसऱ्या सिनेमात आम्ही सगळं दाखवणार आहे.  आनंद दिघे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. हे काय चालू आहे. माझं पद काढून घेत आहेत अशी विचारणा केली. तो दिघे साहेबांना नको ते बोलला. मी शेवटी साहेबांना असं करु नका सांगितलं. मग साहेबांनी त्याला बोलवलं आणि आपल्या भाषेत, आतल्या खोलीत समजावलं. आम्ही चित्रपटात उलट, चांगलं दाखवलं," असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. नरेश म्हस्के हे आनंद दिघेंचे खरे शिष्य आहेत असंही ते म्हणाले. 

"उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची वेळ आली तेव्हा दिघे साहेबांनी राज ठाकरे यांना पद द्या असं सुचवलं होतं. दिघे साहेबांना मानसिक त्रास झाला होता. दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्दव ठाकरेंना भेटलो तेव्हा त्यांची संपत्ती कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. तो फकीर माणूस, दोन हाताने सगळं वाटणार त्यांची काय संपत्ती असणार. मला त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत असं वाटलं, पण नाईलाजाने काम करावं लागलं," अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 
 
"ठाणे मिळणार नाही असं तुम्हाला वाटत होतं. पण मी वरिष्ठ पातळीवर ठाणे आमची भावना, आनंद दिघेंच्या संवेदना आहेत. तो एक मतदरासंघ म्हणून महत्वाचा नाही असं सांगितलं होतं. मी मोठा कार्यक्रम केला तेव्हा मी माझं काम केलं असून आता तुम्ही तुमचं काम करा असं सांगितलं. नरेंद्र मोदी, अमित शाह ताकदीने पाठीशी उभे राहिले," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.