ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपकडून तिकीट; संजय राऊत म्हणतात, 'इमान, निष्ठा नसेल तर...'

Kalaben Delkar : लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. भाजपने कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली या जागेवरून उमेदवारी दिली आहे. कलाबेन डेलकर या आधी ठाकरे गटात होत्या.

आकाश नेटके | Updated: Mar 14, 2024, 09:03 AM IST
ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपकडून तिकीट; संजय राऊत म्हणतात, 'इमान, निष्ठा नसेल तर...' title=

Loksabha Eelction 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या 20 जणांची नावं या यादीत आहेत. या यादीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. या मोठ्या नावांसोबत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचेही नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपने या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून भाजपने बुधवारी ठाकरे गटाच्या विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांना तिकीट दिले. कलाबेन डेलकर यांनी त्यांचे पती आणि खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर 2021 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली होती. मोहन डेलकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. मात्र त्यानंतर आता भाजपने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या उमेदवारीवरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"कलाबेन डेलकर यांचे नाव भाजपच्या यादीत असलं तरी ती जागा शिवसेना लढवणार आहे. कलाबेन डेलकर जेव्हा संकटात, अडचणीत होत्या तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेच साथ दिली. अशा वेळी त्या कुटुंबाला इमान, निष्ठा नसेल तर ठीक आहे पाहू," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

"नितीन गडकरींचे नाव पहिल्या यादीत आले असते तर आनंद झाला असता. महाविकास आघाडीची यादी योग्य वेळी येईल. 48 मतदार संघाची यादी एकत्र जाहीर होईल. अजिबात संभ्रम नसून जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागावाटप जाहीर करु," असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांचा मृतदेह सापडला होता. डेलकर यांच्या निधनामुळे दादरा आणि नगर हवेली लोकसभा जागा रिक्त झाली होती. सहानुभूतीच्या लाटेवर कलाबेन डेलकर मते मिळवत पोटनिवडणुकीत भाजपचे महेश गावित यांचा सुमारे 51 हजार मतांनी पराभव केला.