महाबळेश्वर : फिरण्यासाठी जायचा विचार करताय तर उत्तम पर्याय

डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी उत्तम पर्याय

शैलेश मुसळे | Updated: Dec 14, 2020, 09:02 PM IST
महाबळेश्वर : फिरण्यासाठी जायचा विचार करताय तर उत्तम पर्याय title=

मुंबई : डिसेंबर महिना जवळ आला की, अनेक जण बाहेर फिरण्यासाठी निघतात. यंदा ही अनेकांनी प्लान केला आहे. कोरोनामुळे अनेक जण गेले ८ महिने घरातच आहेत. बाहेर फिरण्यासाठी जाताना मात्र काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी जावू शकतात. महाराष्ट्रात अनेक चांगली ठिकाणं आहेत. जेथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एन्जॉय करु शकतात. असाच एक पर्याय म्हणजे थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर. (Mahabaleshwar)

महाबळेश्वरला तुम्ही २ किंवा ३ दिवसासाठी फिरायला जावू शकतात. सातारा येथून महाबळेश्वरला जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत. तुम्ही स्वत:ची गाडी घेऊन देखील या ठिकाणी जावू शकतात. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल किंवा बंगलो उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील तुम्ही ती बूक करु शकता.

१. क्षेत्र महाबळेश्वर

हे एक सर्वात प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. या प्राचीन मंदिराला तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

२. प्रतापगड

महाबळेश्वर पासून २० किमी अंतरावर प्रतापगड आहे. प्रतापगडावर कडेलोट पॉईंट आहे. गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध झाला. गडावर तुळजाभवानीचे मंदिर आणि शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा आहे.

३. विल्सन पॉईंट

महाबळेश्वर मधील उंच पॉईंट असलेला विल्सन पॉईंट वरुन दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर सुर्योदय पाहता येतो. तर तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्णा नदीचे खोरे दिसते.

४. तापोला

तापोला याला महाराष्ट्राचे मिनीकाश्मीर म्हणतात. नौका विहारासाठी येथे लोकं येतात. हा देखील एक सुंदर पॉईंट आहे. ज्याला तुम्ही भेट देऊ शकता.

५. वेण्णा तलाव

पर्यटकांना येथे नौका चालवण्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी बाजुला घोडेस्वारी देखील करता येते. तलावाच्या मागे घनदाट अरण्य आकर्षित करतो.

६. टेबललँड

पर्यटकांमध्ये टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. येथे घोडा गाडीवर बसून संपूर्ण मैदानाचा फेर फटका मारता येतो. येथे २ गुहा आहेत. ज्या पाहण्यासाठी लोकं नक्की जातात. गुहेत असलेले शिवमंदिर आणि लायन गुहा येथे पाहता येते.

७. मालाज फुड मार्केट

भोसे येथे मालाज फुड प्रॉडक्ट कंपनी आहे. येथे विविध फळांचे जाम, जेली मार्मालेडस्, क्रशेस आणि सिरपचे उत्पादन केले जाते. 

८. मॅप्रो गार्डन

या ठिकाणी तुम्हाला विविध फ्लेवरच्या आईस्क्रीम खायला मिळतात. पिज्जा तसेच अनेक गोष्टी येथे मिळतात. सोबतच तुम्ही येथे चॉकलेट, सिरप, जाम आणि इतर गोष्टींची खरेदी करु शकता.

९. शिवकालीन खेडेगाव

या ठिकाणी तुम्ही शिवकालीन खेडेगाव कसे होते. हे पाहू शकता. य ठिकाणी तुम्हा फोटोग्राफी करण्याचा आनंद मिळू शकतो. या ठिकाणी सध्या १०० रुपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारला जातो.