महाबळेश्वरच्या ओल्याचिंब आणि हिरव्यागार वाटा

सुखं म्हणजे काय हे या हिरव्या सुखसोहळ्याकडे पाहात अनुभवावं. 

Updated: Jul 6, 2018, 11:15 PM IST

विकास भोसले, झी मीडिया, महाबळेश्वर : कोयनाधरण पाणलोट क्षेत्रासह  महाबळेश्‍वर-पाचगणी परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने  सर्व परिसरात हिरवा गालिचा पसरु लागला आहे. हेच ते पावसाचं घर.... सह्याद्रीच्या कडेकपारीतलं महाबळेश्वर..... चैतन्य म्हणजे काय.... सुखं म्हणजे काय हे या हिरव्या सुखसोहळ्याकडे पाहात अनुभवावं. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा ओल्याचिंब आणि हिरव्यागार झाल्यायत. पाचगणीमधल्या सिडने पॉईंट, टेबल लॅन्ड आणि पारसी पॉईंटवर उभं राहिलं की निसर्गाच्या या जादुई कुंचल्याची किमया पाहाता येते.धोम धरण ओसंडून वाहतंय.

धबधबे भरभरुन वाहू लागले

पाचगणी-महाबळेश्‍वर आणि कोयनानगर  म्हणजे निसर्गाला पडलेली दोन गोड स्वप्नं....भन्नाट रानवारा, फेसाळलेले धबधबे, हिरवीगार सृष्टी हे सारं काही भन्नाट.... अलौकिक...साताऱ्यातलं जिल्ह्यातलं महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कोयना, बामणोली, ठोसेघर, ओझर्डे, भांबवलीचे धबधबे भरभरुन वाहू लागलेत.... पुढचे तीन एक महिने हा हिरवागार सुखसोहळा अनुभवता येणार आहे.... एऱाद्या वीकेण्डला एकदा तरी गाडी काढा आणि निसर्गाचं हे दान भरभरुन लुटून घ्या.