रंगपंचमीच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Ahmednagar : देशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. 

Updated: Mar 25, 2024, 04:16 PM IST
रंगपंचमीच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं title=

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : देशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात  एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. या तिघांचाही मृत्यू झाला. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा इथली ही धक्कादायक घटना आहे. लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावं आहेत.  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नगर पोलिसांनी आरोपी सुनील गोरख लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काय आहे नेमकी घटना?
पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केलेल्या या कृत्यामुळे नगरसह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. नगर शहरा जवळ असलेल्या पिंपळगाव लांडगा इथं राहाणाऱ्या आरोपी सुनील लांडगे याने आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडलं बाहेरून कुलूप लावेल आणि घरामध्ये पेट्रोल टाकून आग लावली. यात पत्नी आणि दोन मुलींचा जाळून जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे. 

आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धावले. मात्र आग लागलेल्या घराला कुलूप असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही. दरम्यान नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतलं. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या
दरम्यान, नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर म्हाडा बिल्डिंग इथल्या सुलभ शौचालया परिसरात आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडलीये निलेश श्रीपत उपाडे (वय 21) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. निलेशची रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली. आमची कुरापत का काढतो अशा किरकोळ कारणामुळे काही जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यात सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यात चार विधी संघर्ष बालक आहे. तर दोन सज्ञान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. हे देखील रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.