राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.

Pravin Dabholkar | Updated: Oct 7, 2023, 02:57 PM IST
राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा title=

Maharashtra Job:महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी शासकीय शाळातील 1500 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, असे पवार यांनी सांगितले.

शिक्षक भरती एका दिवसात होत नाही. नवीन भरती येईपर्यंत आपण कॉंट्रॅक्टवर भरती करतो. कारण तोपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे असते.

ठक्कर बाप्पा आदिवासी योजनेअंतर्गत 3 हजारपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असेल तर 1 कोटी निधी दिला जाईल. दीड ते 3 हजार लोकसंख्येसाठी 75 हजार आणि पुढे अशाप्रकारे निधी दिला जाईल. कोणत्याही आदिवासी बांधवाचे गाव, घरे, वाडीचा विकास राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. 

आम्हाला किती दिवस मानधनावर ठेवणार? असे अंगणवाडी सेविकांचे म्हणणे होते. पण तुम्हाला विश्वास वाटेल असा निर्णय लवकरच घेऊ असे अजित पवार म्हणाले. 1 रुपयात पिक विमा उतरवण्याचे क्रांतिकारी काम आम्ही युतीच्या काळात केले. बाकी तुमचे हजारो-कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार भरते, याची माहिती त्यांनी दिली. 

ज्यांना ज्यांना आतापर्यंत आरक्षण दिली आहे त्यांना धक्का न लागता आरक्षण देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा आहेसध्याचे आरक्षण कायम ठेवून दुसऱ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न असेल, असे पवार म्हणाले.संविधानाने घटनेने सर्वांना आरक्षण मागण्याचा अधिकार दिला आहे. त्याला कायद्याच्या चौकटीत बसण्याचा काम राज्यकर्त्यांना करावे लागते. आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही जबाबदारीने सांगतो, असे ते म्हणाले.

मी नाराज असल्याच्या सर्वत्र बातम्या लावतात पण मी आजारी होतो म्हणून कॅबिनेटला गेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. हे तीन पक्षांनी चालवलेले सरकार आहे. त्यामध्ये थोड्याफार अडचणी येणार. मात्र राज्याचा हित डोळ्यासमोर ठेवून आणि पुढे चाललेलो आहोत, असेही ते म्हणाले.