NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार

Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: रविवारी अजित पवारांबरोबर 9 राष्ट्रवादी आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राज्यात नवीन राजकीय संघर्ष सुरु झाला असून आता हा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2023, 11:27 AM IST
NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार title=
पवार विरुद्ध पवार वाद निवडणूक आयोगाकडे

Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील नाराज आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्यात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) गट असा संघर्ष पहायला मिळत आहे. एकीकडे हा संघर्ष अगदी रस्त्यावर उतरुन सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही गटांनी थेट निवडणूक आयोगाकडेही (Election Commission Of India) पक्षासंदर्भात अर्ज केले असल्याने हा संघर्ष शिवसेना संघर्षाच्या वाटेनं जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

अर्जांमध्ये काय म्हटलंय?

अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने म्हणजेच शरद पवार गटाने निवडणूक आयोगात अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करत थेट निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील अर्ज केला आहे. 2 दिवसांपूर्वीच शरद पवार गटाने पक्षातील कोणत्याही नेत्याने पक्षावर दावा केल्यास आमची बाजू ऐकून घेतली जावी असा अर्ज केला होता. त्यानंतर आता अजित पवार गटाने थेट पक्षावर दावा केला आहे.

अजित पवारांना काय करावं लागेल?

माजी मुख्य सचिव (महाराष्ट्र विधानसभा) अनंत कासले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हासाठी अर्ज करावा लागणार होता. अशाचप्रकारचा अर्ज अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला आहे. "अजित पवार यांच्याकडून आपण राष्ट्रवादी आहोत असा दावा केला जाणार असेल तर त्यांना यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना तिहेरी चाचणी पूर्ण करणं गरजेचं आहे," असं कासले यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. तिहेरी चाचणीसंदर्भात स्पष्टीकरण देताना कासले यांनी अजित पवारांना पक्षाचं ध्येय आणि उद्देश काय आहे हे सांगावं लागेल, सदस्य संख्या किती आहे याची माहिती द्यावी लागेल. तसेच किती आमदार आणि खासदारांचा पाठींबा असून त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये किती मतं मिळाली आहेत याचे तपशील द्यावे लागणार आहे.

शिंदेंकडून मदत आणि धडा

एकनाथ शिंदे गटाच्या एका नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात अजित पवारांना चांगलं मार्गदर्शन करु शकतात असं म्हटलं आहे. शिंदेंनी मागील वर्षभरामध्ये निवडणुक आयोगासमोर पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात आपली भूमिका मांडताना या सर्व गोष्टी केल्या असून ते मार्गदर्शन करु शकतील असं या नेत्याने म्हटलं आहे. शिंदेंनी दिर्घकालीन लढ्यानंतर खरी शिवसेना ही शिंदे गट असल्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालासहीत पक्षावरील दाव्याचं प्रकरण जिंकलं होतं असं या नेत्याने म्हटलं आहे. शिंदे गटाच्या संघर्षामधून अजित पवार गटाने आधीच अभ्यास करुन ठेवला असल्याचं सूचक विधानही या नेत्याने केलं आहे.