राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले. 

राजीव कासले | Updated: Dec 7, 2023, 06:54 PM IST
राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा title=

Pawar vs Pawar : नागपूर विधानभवन परिसरात असलेल्या राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या कार्यलायवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) नावाची पाटी झळकतेय. त्यामुळं राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाचं हे ऑफिस आहे, असा कुणाचाही समज होईल. मात्र याच ऑफिसवर राष्ट्रवादी शरद पवार गटानंही (Sharad Pawar Group) दावा केलाय. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इथं धक्कादायक प्रकार घडला.

राष्ट्रवादी ऑफिसचा वाद 
नागपूर विधानभवन इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी तीन केबिन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली केबिन उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी होती, दुसऱ्या केबिनवर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची पाटी होती. पण गुरूवारी सकाळी अचानक तिसऱ्या केबिनवर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांची (Jitendra Awhad) पाटी झळकली. त्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र अवघ्या अर्ध्या तासात तिथल्या कर्मचाऱ्यांनी आव्हाडांच्या नावाची पाटी काढून टाकली. त्यामुळं हे ऑफिस नेमकं कुणाचं? अजित पवार गटाचं की शरद पवार गटाचं? यावरून नवा वाद सुरू झालाय.

दोन्ही गटाचे प्रतोद
दोन्ही गटांच्या पाट्या या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती.  तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे प्रतोद आहे. त्यांची देखील पाटी या ठिकाणी लावण्यात आली होती. मात्र आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांची पाटी काढण्यात आली. दुसरीकडं विधानसभा अध्यक्षांनी मात्र या वादाबाबत आपणाला काहीच कल्पना नसल्याचं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या कुणाही आमदारानं वेगळा गट स्थापन करण्याचं पत्र दिलेलं नाही, अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली. राष्ट्रवादी कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या ऑफिसची नवी भर पडलीय.

सध्या तरी विधिमंडळ पक्ष कार्यालयाचा ताबा अजित पवारांकडेच राहिल, असं दिसतंय.. आता शरद पवार गट यापुढं तरी स्वतंत्र ऑफिसची मागणी करणार? की अजित पवार गटाची दादागिरी सहन करत राहणार? ते पाहायचं.

अजित पवार गटाची बोचरी टीका
अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांची तुलना थेट अभिनेत्री राखी सावंतसोबत केलीय.. अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आव्हाडांवर घणाघाती टीका केलीय. तसंच प्रसिद्धी मिळवण्यासाठी जितेंद्र आव्हाड अजित पवारांवर वक्तव्य करतात असा आरोपही केलाय...