ठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...

"गुवाहाटीमध्ये ज्या नावाची आम्ही चर्चा केली तेच नाव आम्हाला मिळालं"   

Updated: Oct 10, 2022, 09:08 PM IST
ठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...   title=

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीआधी (Andheri Bypoll Election) केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिली आहेत. ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' अशी नावं दिली आहेत. यामध्ये ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आहे मात्र शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालेली नाहीत. दुसरीकडे ठाकरे गटाने नाव आणि चिन्ह मिळताच मोठी गर्जना केली आहे. 

ठाकरे-शिंदे गटाच्या प्रतिक्रिया 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आम्हाला मिळालं आहे. आम्ही पहिली लढाई जिंकली आहे. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून हे चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवायचं आहे. काही लोकांनी आपल्या पक्षात काळरात्र निर्माण करण्याचे ठरवले. आता उष:काल सुरू झाला आहे. ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे, हे आता दाखवायचं असल्याचं मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यापुढे बाळासाहेबांची शिवसेना म्हणून संबोधलं जाणार आहे. ही नक्कीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, आम्ही गेले तीन महिने आम्ही हेच सांगत होतो, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना असल्याचं शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे. 

मी गुवाहाटीला असल्यापासून सांगत होतो की आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे.  गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे मी आणि आमदारांची जी चर्चा झाली होती तेच नाव आम्हाला मिळालं आहे. देवाची कृपा आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने आम्ही पुढे चालत राहू, असं दीपक केसरकर म्हणाले. 

अंधेरी पोटनिवडणूक मशाल चिन्हावर 
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke Death) यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Andheri By Poll 2022) लागली आहे. 

निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला चिन्ह दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गट 'मशाल' या चिन्हावर पोटनिवडणूक लढवणार आहे. 3 नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पोटनिवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात आहे.