Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार! विदर्भासह कोकणात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : आठवड्याची सुरुवातही पावसानं दणक्यात केली असून, पुढील काही दिवसही पावसाचे हेच तालरंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं कोकण विदर्भात पावसाच्या सरी बरसणार हे नक्की   

सायली पाटील | Updated: Jul 18, 2023, 09:11 AM IST
Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार! विदर्भासह कोकणात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट  title=
Maharashtra Rain orange alert issued for konkan and vidarbha latest updates

Maharashtra Rain : जुलै महिन्यातही पावसानं चांगलाच जोर धरला असून, आता सुरु असणारा आठवडाही या पावसानं न्हाऊन निघणार आहे. कारण हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी, रायगड आणि विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, पुणे आणि नागपूर जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतही सोमवारी रात्रीपासून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सरुवात झाली. ज्यानंतर मंगळवारी सकाळी शहराच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला, तर काही भागांमध्ये ओसरला. शहरावर सध्या असणाऱ्या काळ्या ढगांची चादर मात्र कायम असून, काही रस्त्यांवर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

विदर्भाला ऑरेंज अलर्ट 

छत्तीसगड झारखंड भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी या भागात पुढील 48 तासांसाठी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवस मुसळधार बरसल्यानंतर 20 जुलैला पाऊस कमी होऊन 21 तारखेनंतर पुन्हा बंगालच्या उपसागरात मान्सूनतयार होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. त्यामुळे पावसचा जोर आणखी वाढणार आल्याचा इशारा नागपूर हवामान विभागाचे उपसंचालक मोहनलाल साहू यांनी दिला. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र, यात तुमचं नाव तर नाही?

पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार पुणे, सातारा आणि राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्ये मंगळवारी सकाळी 11 ते 1 वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून, दृश्यमानताही कमी असणार आहे. 

गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोलीत मुसळधार पाऊस असणार आहे, तेच नागपूर यवतमाळ वर्धा त्या तुलनेत थोडा कमी असेल. यात परिस्थिती बिघडू शकते त्याने प्रशासन सुद्धा नागरिकांना काळजी घेत वादळीवाऱ्यासह ढगांचा गडगडाट होईल असा इशारा आहे.

मान्सूनचा नवा टप्पा सक्रिय... 

सध्याच्या घडीला अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली  आहे. परिणामी किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. इतकंच नव्हे, तर देशातील बहुतांश भागामध्ये सुरु आठवड्यामध्या पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळणार आहे.