Maharashtra Rain : आजही कोसळधार! रायगड, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, कोकणात शाळांना सुट्टी

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांना बुधवारी पावसानं झोडपलं. कल्याण, भिवंडी, बदलावूर या भागांमध्ये पावसामुळ पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं.   

सायली पाटील | Updated: Jul 20, 2023, 08:09 AM IST
Maharashtra Rain : आजही कोसळधार! रायगड, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, कोकणात शाळांना सुट्टी title=
Maharashtra Rain red alert in raigad pune orange alert in mumbai latest update

Maharashtra Rain : बुधवारच्या जबरदस्त बॅटिंगनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस काही अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. गुरुवारसाठीसुद्धा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या धर्तीवर रायगड, पुण्यातील घाट माथ्यावरील परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबईतही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा हा इशारा पाहता मुंबई, ठाणे, कोकणात आज (गुरुवारी) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील पावसाची स्थिती पाहता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याबाबतची घोषणा केली. 

कोकणासह विदर्भालाही पावसाचा इशारा 

हवमान विभागानं कोकणासोबतच विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस हवामान विभागाने पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात एका मागून एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चांगला पाऊस पुढील पाच दिवस होणार आहे. 21 आणि 22 जुलैला पूर्व विदर्भात पाऊस होईल. जसजसा कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत जाईल तसतसा पाऊस 24 ते 25 दरम्यान अधिक जोरदार पाऊस होईल असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे उपसंचालक मोहनलाल साहू यांनी दिला आहे. 

हेसुद्धा वाचा : Irshalgad Landslide Photos: भयंकर! दरड कोसळल्यामुळं इरसालवाडी उध्वस्त

मुंबईत वाहतुकीवर परिणाम 

बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांसोबतच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत होण्यासोबत वाहतुकीवरही याचे थेट परिणाम दिसून आले. बुधावारी मुंबई शहरात 100 मिमी, पूर्व उपनगरात रात्रीच्या सुमारास 97 मिमी, पश्चिम उपनगरात रात्री 110 मिमी इतका पाऊस झाला. या पावसाचे थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाले. जिथं मध्य रेल्वे कोलमडली. गुरुवारी ही रेल्वेसेवा पूर्वपदावर आली.  पश्चिम रेल्वेचं सांगावं तर, सध्या ती 15 ते 20 मिनिट उशिराने धावत असल्याचं कळत आहे. 

राज्यातील पावसाचा आढावा... 

बुधवारी झालेल्या पावसामुळं कल्याण, भिवंडी, बदलापूरसह नेरळमध्येही अनेक भाग जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथ तालुक्यातल्या JNPT-वडोदरा महामार्ग कामामुळे जांभळे आणि सावरे गावाचा बदलापूर शहराशी संपर्क तुटला. या महामार्गाच्या कामात मोठा भराव टाकला जात असल्यानं इथले नैसर्गिक नाले बंद झालेत. त्यामुळे पहिल्याच मोठ्या पावासात हे रस्ते पाण्याखाली गेले. 

तिथं रत्नागिरी, महाड, कोल्हापूरात नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळं नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचं काम यंत्रणांनी हाती घेतलं.

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील परसोडी शिवारातील जांगोना इथं, शेतात पाणी शिरुन पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतालगतच्या बंधाऱ्यामुळे हे पाणी अडून शेतात शिरलं. यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं. 

हिंगोलीत गेल्या 24 तासात 71 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पिकांना नवं संजीवनी मिळालीय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.30 मिलिमीटर पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या 30.59 टक्के इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.