दहावीचा निकाल पाहा कधी होणार जाहीर, अशी तयारी सुरु झाली !

 राज्यातील दहावीचा निकाल पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra : SSC Exam results 2021) निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.  

Updated: Jun 10, 2021, 09:32 AM IST
दहावीचा निकाल पाहा कधी होणार जाहीर, अशी तयारी सुरु झाली ! title=
संग्रहित छाया

मुंबई : आता एक महत्वाची बातमी. राज्यातील दहावीचा निकाल पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra : SSC Exam results 2021) निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 10वीचा निकाल (SSC Exam Results) जुलै महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागणार आहे.

दरम्यान, आज मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आज यूट्यूबद्वारे मूल्यमापनाबाबत कार्यशाळा घेतली जाणार आहे. 25 ते 30 जून दरम्यान प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक  स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत. निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जारी केले आहे. याअंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

3 जुलैपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या स्तरावरील निकालाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्य मंडळाकडून अंतिम निकाल जाहीर होईल, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, शाळेचा संकलित निकाल तयार करताना परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय प्राप्त गुण नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सवलतीचे गुण, कला आणि क्रीडा सवलतीचे गुण नोंदवण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.