अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान

सध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 12, 2024, 11:03 AM IST
अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान title=

Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला अवकाळी पावसाने दिलासा दिलासा आहे. रविवारी (12 मे) पहाटे मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यातील हवामान विभागाने आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 12  ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबईत ढगाळ वातावरण

मुंबईत आज सकाळपासूनच वातावरणात बदल झाला आहे. मुंबईत ठिकठिकाणी ढगाळ आणि दमट वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईत रविवार आणि सोमवार या दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  

मुंबई शहर, तसेच उपनगरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. तसेच शहरात रात्रीही प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. सध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पुढील पाच दिवस मुंबईतील कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

सोलापुरात विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस

मुंबईसह पुणे, सातारा, सोलापूर, गोंदिया या ठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. सोलापूर शहरात दमदार अवकाळी पाऊस बरसला. सोलापुरात काल संध्याकाळी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. सोलापुरात काल दिवसभरात 42.03 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर रात्री पावसामुळे सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तसेच आज सकाळपासून सोलापुरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

तर दुसरीकडे पुण्यातील मुळशी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे काढणीस आलेल्या ज्वारीच्या पिकांचे, तसेच टोमॅटो, आंब्याच्या फळबागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना शेतात झाकून ठेवलेला पेंढा, कडब्याच्या उभ्या करून ठेवलेल्या पेंढ्या पावसाने भिजल्याने जनावरांचा चारा खराब झाला आहे. त्यामुळे मुळशीतील बळीराजाचे मोठं नुकसान झाले आहे.

पर्यटक सुखावले

तसेच साताऱ्यातील महाबळेश्वर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे बाजारपेठेत सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाका जाणवत होता, मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे पर्यटक सुखावले आहेत. सध्या महाबळेश्वरमधील अनेक पर्यटक या पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

गोंदिया जिल्ह्यात 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कृषी व महसूल विभागांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी नुकसानीचे योग्य पंचनामे करण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाला दिले. तर शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.