Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार

Maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस नेमका कधी थांबतो याकडेच शेतकऱ्याची नजर लागली होती. आता राज्यातून या अवकाळीनं काढता पाय घेतला तरी काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे.   

Updated: Apr 3, 2023, 07:04 AM IST
Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार title=
Maharashtra weather Rain predictions in vidarbha temprature increases in mumbai and konkan

Maharashtra weather : मुंबईसह (Mumbai Konkan) कोकण आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागात उन्हाचा दाह पुन्हा जाणवू लागला आहे. सकाळची वेळ वगळता संपूर्ण दुपारभर उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. परिणामी राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानातही काही अंशांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही विदर्भातून मात्र अवकाळी पाऊस काही केल्या काढता पाय घेत नसल्याचं स्पष्ट होत आहे. सोमवार आणि मंगळवारीही विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची बरसात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यातही उन्हाचा दाह मात्र जाणवणार असल्यामुळं विदर्भात हवामान नागरिकांच्या नाकी नऊ आणणार याचीच भीती व्यक्त केली जात आहे. 

महाराष्ट्रातील उर्वरित भागात कोरडं हवामान राहणार असून, कोकण किनारपट्टी भागात उष्ण वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सातारा, पुणे, कोल्हापूर भागातही हवामान कोरडं राहून आकाश निरभ्र राहील. 

गेल्या 24 तासांतील तापमान... 

पुणे 34.3 
जळगाव 36.0
धुळे 35.0
कोल्हापूर 34.6
महाबळेश्वर 29.2
नाशिक 32.4 
मुंबई 31.6 
रत्नागिरी 33.7

देशातील हवामानाची काय परिस्थिती? 

देशातील हवामानाबद्दल सांगावं तर, इथं राजस्थानचा पश्चिम भाग आणि त्यानजीकच्या परिसरात काही भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. ज्यामुळं तिथं उष्णतेचा दाह काही अंशी कमी जाणवणार आहे. तर, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू भागात कमी दाबाचा पट्टाही तयार होताना दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : Uddhav Thackeray: ...तेव्हा तुम्ही मिंधेंचं काय चाटत होता? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

 

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या उत्तर पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणांवर पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील काही भागात जोरदार ते मध्यम स्वरुपात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. यादरम्यान, ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार आहेत. 

हिमाचलमध्ये यलो अलर्ट... (yellow alert issued in himachal pradesh) 

सध्याच्या घडीला हिमाचल प्रदेशाच्या दिशेनं जाणाऱ्या पर्यटकांचा आकडा मोठा आहे. असं असलं तरीही या भागात हवामान विभागाकडून पाऊस आणि गारपीटीच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथं, सकाळच्या वेळी वातावरणामध्ये फारसे बदल अपेक्षित नसले तरीही दुपारहून दिवस पुढे जाताना अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. त्यामुळं तुम्ही घराबाहेर कुठेही निघत असाल तर, तापमानाचा अंदाज एकदा विचारात घ्या.