महाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?

Maharashtra weather updates : राज्याच्या एखाद्या भागात तुम्ही वर्षाचा शेवट करण्यासाठी जाणार असाल, तर पाहून घ्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स, अर्थात हवामानाचा अंदाज 

सायली पाटील | Updated: Dec 26, 2023, 07:36 AM IST
महाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?  title=
Maharashtra weather updates Cold wave latest update

Maharashtra weather updates : पहाटेची गुलाबी थंडी नेमकी काय असते याचा अनुभव सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत आहे. इतकंच नव्हे, तर मुंबईतही रात्री उशिरानं तापमानात घट नोंदवली जात असून, झोंबणारे गार वारे सुखद अनुभव देऊन जात आहेत. सध्या शहरामध्ये किमान तापमान 24 अंशांवर पोहोचलं असून, त्यातही घट नोंदवली जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाच चढ- उतार होत असले तरीही उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीची लाट कायम आहे. परिणामी येत्या काळात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सोमवारी धुळ्यामध्ये तापमान 8 अंशांवर होतं, तर पुण्यात किमान तापमान 11.7 अंशांवर पोहोचलं होतं, निफाडमध्ये पारा 8.7 अंशांवर पोहोचला होता. तर, साताऱ्यामध्ये तापमान 13 अंशांवर होतं. पाचगणी आणि महाबळेश्वर भागामध्येही तापमानाचा आकडा 11 अंशांवर पोहोचल्यामुळं इथं रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा मारा होत असल्याचं पाहायला मिळालं. सध्या राज्यात निफाड, धुळे, परभणी आणि जळगाव भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी असून, आठवड्याअखेरपर्यंत ते कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

मुंबईत धुकं की धुरकं? 

इथं मुंबईला थंडीची चाहूल लागली असली तरीही शहरामध्ये सध्या दृश्यमानता प्रचंड कमी असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे थंडीचं वातावरण आहे, म्हणून हे धुकं आहे असा तुमचा समज होत असेल तर तसं नाहीये. कारण, शहरावर सध्या धुक्याची नव्हे धुरक्याची डादर पसरली असून, प्रदूषणानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. 

सध्या मुंबईत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं धुलिकण हवेतच स्थिरावले आहेत. ज्यामुळं शहराचा श्वास पुन्हा एकदा गुरमरू लागला आहे. 

हेसुद्धा वाचा : सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला? 

दरम्यान, सध्या देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. काश्मीरमध्ये शीतलहर आली असून, इथं तापमान उणेच्याही खाली पोहोचलं आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रांमध्येही हीच परिस्थिती, तर मैदानी क्षेत्रामध्ये कुठे अचानकच बरसणारा पाऊस आणि दातकिळी बसवणारी थंडी असं चित्र पाहायला मिळत आहे.