अनोख्या मामा-भाचा देवस्थानात यात्रेसाठी गर्दी

नववर्षाच्या स्वागताची अनोखी प्रथा भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भाग असलेल्या गिरोला या ठिकाणी पाहावयास मिळत असते.

Updated: Jan 2, 2018, 09:50 AM IST
अनोख्या मामा-भाचा देवस्थानात यात्रेसाठी गर्दी  title=

माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया  : नववर्षाच्या स्वागताची अनोखी प्रथा भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भाग असलेल्या गिरोला या ठिकाणी पाहावयास मिळत असते. जंगलात नववर्ष निमित्ताने दोन दिवस चालणाऱ्या या मामा-भाचा देवस्थानात मोठ्या श्रद्धेने एकत्रित येत या यात्रेचा आनंद लुटत असतात.

या यात्रेचं वैशिष्ट्य

जंगलाच्या मधोमध सजलेली विविध वस्तूंची दुकाने आणि या दुकांनावर ग्रामस्थांची असणारी गर्दी आणि खाद्य पदार्थाची रेलचेल.. ही सर्व दृष्य आहेत, नववर्षाला भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सिमेवर गिरोला या ठिकाणच्या प्रसिद्ध असणा-या मामा भाच्याची जत्रेमधील.. सडक अर्जुनी तालुक्यात येणारे गिरोला या गावा नजीक असलेल्या घनदाट जंगलात हि यात्रा दर वर्षी नवीन वर्षाचा सुरुवातीला भरवण्यात येते. दोन दिवस चालणा-या या यात्रेला दुरदुरुन भाविक मामा भाचे देवस्थानला नमन करण्यासाठी येतात.. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत अजुनही कुठल्याही प्रकारची वृक्षतोड़ होत नाही हे विशेष...

मामा भाच्याची मूर्ती

या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या ठिकाणी मामा भाच्याची मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी आजही दोन वृक्ष हे मामा भाचाचे प्रतीक म्हणून असून भाविक या वृक्षाची देखील पूजा अर्चना या यात्रा निमित्ताने करीत असतात. या यात्रेच्या निमित्ताने आजूबाजूचा परिसरातील गावकरी एकत्रित येऊन नववर्ष सोबतच बाजारत खरेदीचा देखील आनंद लुटत असतात 

मामा भाच्याच्या यात्रेनिमित्ताने ग्रामस्थ वर्षाचा पहिला दिवस झाडाचा सानिध्यात घालवून जणू आपली कृतज्ञताच व्यक्त करतात.