जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक

जालन्यात ११ महिलांची फसवणूक

Updated: Jun 13, 2019, 03:38 PM IST
जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक title=

नीतेश महाजन, झी मीडिया, जालना : कमी व्याजदरात एक लाखांचं कर्ज काढून देतो असं सांगून 11 महिलांना गंडा घातल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी राजस्थानमधील एका भामट्याला गोंदी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुखराज राजम खान असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 

काही दिवसांपूर्वी मुखराज राजम खान हा जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील तीर्थपुरी इथं बाज विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी आला होता. त्यामध्ये त्याची तीर्थपुरी इथल्या काही महिलांची ओळख झाली. तुम्हाला तिरुपती बालाजी येथून आमच्याकडे आलेला पैसा कर्जरुपाने केवळ तीन टक्के व्याजदरानं देतो. मात्र व्याजाचे पंधरा हजार रुपये आधी द्यावे लागतील असं म्हंटल्यावर गावातील काही महिला पैसे देण्यासाठी तयार झाल्या. त्यानंतर मुखराज हा काही महिलांकडून प्रत्येकी पंधरा हजार रुपये घेऊन गेला.

11 जूनला पैसे देतो म्हणून काही महिलांना त्यानं जालन्यात बोलावलं. मात्र इथं आल्यावर त्यानं बनावट नोटांचं गाठोडं या महिलांच्या हाती सोपवलं. त्यात त्याचं बिंग फुटलं आणि काही महिलांसह पुरुषांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.