'...म्हणून मुंबई, पुण्यात सध्या उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नकोच'

महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत

Updated: May 11, 2020, 05:50 PM IST
'...म्हणून मुंबई, पुण्यात सध्या उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नकोच' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि .गेल्या काही काळापासून सुरु असणारा लॉकडाऊन पाहता आता राज्यातील अनेक उद्योगधंदे काही अंशी पूर्वपदावर येत असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

Coronavirus कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

वाचा : मुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन झोनमध्ये आणण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. परिणामी मुंबई, ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड हे भाग रेड झोनमध्ये असल्यामुळे आता उद्योग सुरु करण्याच्या बाबतीत येथील मंडळींनी घाई करु नये हा मुद्दा त्यांनी मांडला.

लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज

एकिकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू पुन्हा वेग पकडण्याच्या प्रयत्नांत आहे, तोच दुसरीकडे राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. 

वीज बिलात सवलत

स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

 

विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी सुरू

राज्यात विदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठीदेखील पावलं उचलली जात असल्याची आशावादी बाब त्यांनी मांडली. ज्याअंतर्गत अनेक देशांकडून या गुंतवणुकीसाठी विचारणाही केली गेल्याच म्हणत अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय येत्या काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होणार असल्याने लघु उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज राहण्याचा सकारात्मक इशाराही त्यांनी दिला.