प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?

Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 30, 2023, 11:39 AM IST
प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?  title=

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला दिलेला 40 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांनी पाणी, उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. थकलेल्या आवाजाने मनोज जरांगे समाजाशी संवाद साधत आहेत. 

जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय. आज सकाळपासून त्यांची हालचालही मंदावलीय.उठायला आणि बसायलाही त्यांना होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून जरांगे झोपूनच आहेत. आजची पत्रकार परिषदही त्यांनी घेतलेली नाहीये. प्रकृती खालावत असली तरीही जरांगे आमरण उपोषणावर ठामच आहेत... तसंच उपचार घेण्यासाठीही त्यांनी नकार दिलाय.

गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीयेत आणि तेही जेवण करत नाहीयेत. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. पण गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाने आतापर्यंत खूप वेदना सहन केल्या आहेत. मराठा जातीवर खूप अन्याय झाला आहे. आता अन्याय होऊ द्यायचा नाही. म्हणून ही लढाई असल्याचे जरांगे म्हणाले. इथे माझा हेकेखोरपणा नाही, आडमुठेपणाही नाही. माझ्या जातीवर अन्याय झाला आहे. मला थांबता येणार नाही, असे जरांगे म्हणाले.

गादीने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कधीही माघार घेतलेली नाही. मीही समाजाच्या कल्याणासाठी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीही खाली पडून दिला नाही. मात्र, माझा नाईलाज असल्याचे ते म्हणाले. समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला न्याय मिळावी म्हणून मला ही कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मराठ्यांची लेकरंबाळं फार तरसली आहेत. त्यामुळे गड्यांनो मला माफ करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.   यात मराठ्यांची लेकरं आहेत. त्या लेकरांसाठी गड्यांनो मला माफ करा. मी पाणी उपचार घेऊ शकत नाही. कारण माझ्या लेकरांच्या काय वेदना आहेत या सरकारने ओळखल्या पाहिजेत. सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मनोज जरांगेंची खालावलेली तब्ब्येत पाहता मराठा कार्यकर्त्यांनांही अश्रू अनावर झाले आहेत. मनोज जरांगे पाणी प्या, भरल्या डोळ्यांनी कार्यकर्ते अशी साद घालत आहेत. 

आत्महत्येचा इशारा 

मनोज जरांगे पाटलांवर तातडीने उपचार करा अन्यथा मी आत्महत्या करेन अशा इशारा नांदेडमधील आरोग्य सेविका रेखा पाटलांनी दिलाय...अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांनी उपचार घेण्याची त्यांनी विनंती केली...जरांगे यांची तब्येत पाहून आरोग्य सेविका रेखा पाटील ढसाढसा रडल्या. सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि जरांगे यांचा जीव वाचवावा अन्यथा आम्ही तलवारी घेऊन तुमच्या घरात घुसू असा इशारा त्यांनी दिलाय.