'चार दिवस उपोषण करुन दाखवावं ' मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आता जरांगेंनी 20 तारखेची मुदत दिली आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 16, 2024, 01:52 PM IST
'चार दिवस उपोषण करुन दाखवावं ' मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान title=

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून मराठ्यांना हवं ते सरकार देत नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करावी, सरकारने फक्त अधिसूचना (GR) काढली पण कायदा केला नाही. आता 20 तारखेपर्यंत कायदा कला असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. सगेसोयऱ्यांच्या समावेशाबाबत कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. आमच्यावर दाखल झालेले राज्यातील गुन्हे मागे घ्या, शिंदे समितीची मुदत एक वर्ष वाढवा, अशा मागण्याही जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. 

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आरक्षण मिळणार आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाटी सगेसोयऱ्यांचा कायदा आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

नारायण राणे यांना आव्हान
नारायण राणे (Narayan Rane) यांनी मध्ये बोलण्याचा ठेका घेतलाय का असा सवाल विचारत नारायण राणे यांनी चार दिवस उपोषण करुन दाखवावं असं आव्हान मनोज जरांगे यांनी केलं आहे. तुमची हवा निघेल मग कळेल असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला आहे. मला चॅलेंज करत असतील तर माझीही खेटायची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय. निलेश राणे यांनी नारायण राणे यांना थांबवावं असा सल्लाही जरांगे पाटील यांनी दिला. पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. यावर 'तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल,  आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असं आव्हान राणे यांनी दिलं होतं. 

सरकारला अहवाल सादर
दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारला अहवाल सादर केलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला जाणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणावर असेल. विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाच मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार आहेत. त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. 

'ओबीसीतील घुसखोरी थांबवा'
तर ओबीसीतील घुसखोरी थांबवा, जबरदस्तीने कुणबीकरण करू नका, असं भुजबळांनी म्हटलंय. कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे खोटे दाखले असलेल्यांना मराठा समाजाला मिळणाऱ्या वेगळ्या आरक्षणात टाका. मराठ्यांना जबरदस्तीने कुणबी करू नका अशी मागणी भुजबळांनी केलीय. 

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडेंनी दिलीये. 

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्तारोको
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय. जालन्यातील जाफ्राबाद-जालना रोडवर अकोला देव फाटा इथं हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जरांगे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. या रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था दोन तास विस्कळीत झाली.