मावळ लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक वैविध्य असलेल्या मावळ मतदारसंघाची हवा काय आहे.

Updated: Jun 27, 2018, 07:40 PM IST
मावळ लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार? title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदार संघाच्या पुनरचनेत संपूर्णत: नव्यान तयार झालेला हा मतदार संघ २०१९ला तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जातोय. अर्धा पुणे जिल्ह्यात आणि अर्धा कोकणात असा विभागला गेलेला हा मतदारसंघ आहे... राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक वैविध्य असलेल्या मावळ मतदारसंघाची हवा काय आहे.

मावळ मतदारसंघ म्हणजे अर्धे पुणे आणि अर्धे कोकण. पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले पनवेल, उरण आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये मोडतात.  गेल्या लोकसभा निवणुकीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवार शोधण्याची धावा धाव करावी लागली. अखेर राहुल नार्वेकर यांना पुढे करण्यात आलं.

शिवसेनेकडून तत्कालिन विद्यमान खासदार गजानन बाबर यांना संधी मिळेल अशी शक्यता असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांची वर्णी लागली. मोदीलाटेमध्ये बारणेंना अनपेक्षित विजयही मिळाला. त्यांनी यांनी जगताप यांच्यावर तब्ब्ल १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीची पुरती धूळधाण झाली...! मात्र आता मतदारसंघातली स्थिती वेगळी आहे. या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व निर्माण झालंय.

बारणे यांचे कट्टर विरोधक आणि उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी आता भाजप प्रवेश केलाय... युतीची शक्यता कमी असल्यामुळे भाजपनं बारणेंवर टीका सुरू केलीये. युती झालीच तर सलग दोन वेळा विजय मिळवल्या मुळे शिवसेना या मतदारसंघावर दावा सांगणार हे नक्की... मात्र भाजपा नेते हा मतदारसंघ आपला असल्याचा दावा करतायत. 

मावळ मतदारसंघात सहापैकी ४ आमदार भाजपाचे आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ आमदार आहे. त्यामुळे भाजपाला या मतदारसंघावर दावा करण्यासाठी सबळ कारण आहे... महापालिका निवडणुकांमध्ये मतदारसंघातल्या जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे.

ती ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढून. साधा सरळ हिशोब केला तरी विधानसभेला सहा ही मतदार संघात मिळून भाजपला ४ लाख ३७ हजार १६१ मते मिळाली तर शिव सेनेला दोन लाख ४६ हजार ७७५ मते मिळाली आहेत.. त्यामुळे युती झाली तरी ही जागा आम्ही सोडवून आणू असा दावा भाजप करतंय...! 

तर मोदी लाटेमुळे लोक भाजपच्या बरोबर होते, असं सांगत या जागेवरचा दावा सोडण्यास शिवसेनेनं स्पष्ट नकार दिलाय... 
 
कधीकाळी सर्वाधिक ताकदवान असलेल्या राष्ट्रवादीची मात्र या अत्यंत दयनीय स्तिथी झालीये...! असं असलं तरी आपण भाजपा-शिवसेनेला टक्कर देण्यास सक्षम असल्याचा दावा स्थानिक नेते करतायत. शेकापसोबत युती केल्यामुळे कोकणात पक्षाची ताकत वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता गेली असली तरी दोन नंबर राष्ट्रवादी आहे आणि जे उरलेत ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, असा नेत्यांचा दावा आहे. 

अर्धा कोकणात आणि अर्धा पुणे जिल्ह्यात असलेल्या या मतदारसंघात उमेदवार कुठला आहे, यालाह महत्त्व आहे. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वच पक्षांनी आतापर्यंत पिंपरी-चिंचवडचे उमेदवार दिलेत. आताही शिव सेनेकडून श्रीरंग बारणे, भाजपकडून लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीकडून संजोग वाघेरे यांची नावं चर्चेत आहेत. भाजपचे उरणचे महेश बालदी आणि पनवेलच्या रामशेठ ठाकूर यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. या मतदारसंघाचं चित्र हे बहुतांश युतीच्या भवितव्यावर अवलंबून आहे. 

काय आहेत मावळ मतदारसंघाच्या समस्या

पुणे आणि रायगड मधल्या तीन मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय, त्यामुळ साहजिकच इथल्या समस्या ही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे त्यामुळ इथ कोकणाला ज्या समस्या आहेत त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत.  पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघावर पगडा आहे तो पिंपरी चिंचवड चा... ।वास्तविक पाहता पिंपरी चिंचवडमधल्या लोकांना मुंबई, लोणावळ्याला   जाण्यासाठी अतिरिक्त ट्रेन्सची आवश्यकता आहे. या फेऱ्या वाढाव्यात आणि त्याच बरोबर ट्रॅकही वाढवले जावेत ही गेल्या कित्येक वर्षांची मागणी  आहे. पण याबाबतीत निर्णय झालेला नाही..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणारी अनेक घर ही संरक्षण विभागाच्या हद्दीत अर्थात रेड झोन मध्ये येतात. हा प्रश्न संरक्षण विभागाशी निगडीत असल्यानं खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं होतं. पण त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. पिंपरी चिंचवडच्या दृष्टीनं मावळ बंद पाईप लाईन योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेमुळे शहराची पाण्याची समस्या पुरती मिटणार आहे. पण या योजनेला मावळ विधानसभा मतदार संघातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. 

या योजनेचे समर्थक आणि विरोधक मतदार संघात येत असल्यामूळे बारणे यांनी कधी ही स्पष्ट भूमिका घेवून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला नाही.... लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोपखेल किंवा रक्षक रस्त्यासंदर्भातही बारणे यांनी काहीच केलं नसल्याची टीका केली जातेय.

.रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर  या भागात रस्ता, रेल्वे आणि वीज या एकाही प्रश्नाला बारणे यांनी हात घातलेला नाही. आदिवासी भागात ते फिरलेच नसल्यानं आदिवासींच्या समस्या त्यांना माहीतही नाहीत, अशी टीका केली जाते. 

दुसरीकडे बारणे यांनी मात्र कधी नव्हे ते मतदार संघात प्रचंड कामं केल्याचा दावा केलाय...! आदिवासी भाग असेल, मावळ असेल किंवा पिंपरी चिंचवड सर्वच.... सगळीकडेच कामाचा धडाका लावल्याचा दावा त्यांनी केलाय..

श्रीरंग बारणे यांनी संसदेत सलग चार वर्षे सर्वाधिक प्रश्न विचारण्याची कामगिरी केलीय...त्यासाठी त्यांना संसदरतन पुरस्कार ही मिळालाय.. पण केंद्र सरकारशी निगडीत प्रश्नावर बारणे काहीसे अपयशी ठरल्याचं समोर येतंय.