सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई

Mumbai Latest News: नया नगर परिसरामध्ये सोमवारी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 24, 2024, 11:54 AM IST
सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई title=
पोलीस बंदोबस्तात करण्यात आली कारवाई

Mumbai News Today: मीरा रोडमधील नया नगर () परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी महानगरपालिकेने कारवाई केली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कारवाईच्या पॅटर्नप्रमाणे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना थेट अनधिकृत बांधकामांवर 'बुलडोझर' फिरवण्यात आला. मात्र महानगरपालिकेने इतर कोणत्याही घटनेशी या कारवाईचा संबंध नसल्याचा दावा करताना ही नियमित कारवाई असल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांनी कारवाईबद्दल काय सांगितलं?

नया नगर परिसरामध्ये सोमवारी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर मंगळवारी सायंकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये नया नगरमधील 4 इमारतींमधील दुकानांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी आमच्याकडे पालिकेने बंदोबस्ताची मागणी केली होती. हा बंदोबस्त आम्ही दिला, असं सांगितलं. 

6 जागी गुन्हा दाखल

दरम्यान, सोमवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील वाकोला, भोईवाडा, गोवंडी, मालवणी, ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान बहुसंख्य ठिकाणी झेंडे लावण्यावरुन वाद झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

फडणवीसांनी नोंदवलेली प्रतिक्रिया

ज्या दिवशी या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले त्याच दिवशी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवताना कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं. "मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही," असं फडणवीस यांनी 22 जानेवारी रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

उत्तर प्रदेश पॅटर्न

यापूर्वी अशाप्रकारे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये अनेकदा बुलडोझरने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मीरा रोडमधील या कारवाईने अनेकांना उत्तर प्रदेश बुलडोझर पॅटर्नची आठवण झाली आहे.