'माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही...'; SC च्या निकालानंतर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray On Marathi Shop Signboards: 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 26, 2023, 12:16 PM IST
'माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही...'; SC च्या निकालानंतर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा title=
राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन नोंदवली प्रतिक्रिया

Raj Thackeray On Marathi Shop Signboards: सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया देताना मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचं अभिनंदन केलं आहे. तसेच या निर्णयानंतरही मराठी पाट्या नसतील तर खळ्-खट्याकचा इशाराही राज यांनी सूचक पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवताना दिला आहे.

आमच्या लढ्याला मिळाली मान्यता

"पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! 'मराठी पाट्या' या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे

"मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे," अशी आठवण राज यांनी पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना करुन दिली आहे.

राज ठाकरेंनी दिला सूचक इशारा

आपल्या पोस्टमध्ये पुढे राज ठाकरेंनी, "असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला. आता सर्वोच्च न्यायालयाने पण यावरुन काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे," असंही म्हटलं आहे. "दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका," असा इशाराच राज ठाकरेंनी न्यायालयाच्या आदेशानंतरही मराठी पाट्यांचा विरोध करण्याचा विचार करत असणाऱ्या व्यापाऱ्यांना अगाऊमध्ये दिला आहे. 

"'मराठी पाट्यां'बाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत," असंही राज यांनी म्हटलं आहे.

मराठी भाषा मंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत

मराठी भाषा मंत्री आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. "मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करतो. मराठी पाट्यांसंदर्भात शासन सातत्याने प्रयत्नशील असते मात्र काही व्यापारी याला विरोध करत न्यायालयात जातात. आता न्यायालयानेच यांना चपराक दिलेली आहे. हे मराठी भाषिक राज्य आहे इथे दुकानांवर मराठी भाषेत पाट्या पाहिजेत," असं केसरकर म्हणालेत.