Raj Thackeray | पुण्यात मनसेची सभा, ठाकरी तोफ कोणावर धडाडणार?

Mns Chief Raj Thackeray Pune Tour | मनसेप्रमुख राज ठाकरे यांची येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात सभा होणार आहे.

Updated: May 16, 2022, 08:08 PM IST
 Raj Thackeray | पुण्यात मनसेची सभा, ठाकरी तोफ कोणावर धडाडणार? title=

पुणे : मनसेची गेल्या काही आठवड्यांत भोंग्याच्या मुद्द्यावरुन मुंबईनंतर ठाणे आणि औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभांमध्ये मनसेप्रमुख (Raj Thackeray) आक्रमक दिसले. राज ठाकरेंनी भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान या सभांनंतर आता राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात सभा होणार आहे. (mns maharashtra navnirman sena chief raj thackeray meeting in pune during to 21 to 28 may)

विशेष म्हणजे राज ठाकरेंचा महिन्याभरातील हा दुसरा पुणे दौरा असणार आहे. याआधी राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिलला दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. तर आता पुण्यात 21 ते 28 मे दरम्यान सभा होणार आहे.

सभा कुठे होणार?

शहरप्रमुख साईनाथ बाबर यांनी पुण्यात जाहीर सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात मनसेची जाहीर सभा ही सर परशुरामभाऊ महाविद्यालय घेण्यात येणार असल्याचं म्हटलंय.

राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी जाहीर सभांचा सपाटा लावला आहे. भाजपकडून पोलखोल सभा घेण्यात आली. तर शिवसेनेकडूनही सभा घेण्यात आली. बीकेसीत शनिवारी 14 मे ला शिवसेनेची जाहीर सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुखांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

त्यामुळे राज ठाकरे पुण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार, तसेच आगामी अयोध्या दौऱ्याबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.